बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१
एक सांगु का बाबा,
एक सांगु का बाबा,
तुम्ही ना मला रोज आठवता.
जेव्हा कुठली मुलगी तिच्या बाबाचा हात ठेवून चालत असते. तेव्हा तुमच्या ही लाडकीचे काळीज आठवणीच्या नौकेत पार डुबून जाते.
किती छान दिवस होते ना बाबा ते जेव्हा तुम्ही सोबत असायचे!
कसलीच काळजी नसायची नुसतं जगण्याचा आनंद ओंजळीत असायचा.
त्या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद आजच्या भल्या मोठ्या गोष्टीत नाही दिसत.
पूर्वी चेहऱ्यावर येणारं निरागस हसू आता मात्र देखाव्यापुरतच येत.
काल नुसता विचार करित होते,बाबा असणे आयुष्यात किती मह्त्वाचे असते नाही का?
आयुष्यात आलेले वादळ तिथे हलकेच विरून जायचे .
कसलाच नसलेला ताप,कसलीच नसलेली काळजी हे सर्व तुमच्या त्यागाने आम्हाला मिळायचे.
आज मला तुम्ही दिलेली डायरी आठवते ,खुप जपुन ठेवलिय बरं मी!
आणि हो बाबा त्या लिहिलेल्या कविता वाचल्या की पुन्हा तुम्ही दिलेली दाद डोळ्यासमोर उभी राहते.
पेपरला दिलेली पेन किती उत्सुकता ती बाबा,वाटायचे कधिच संपू नये हे पेपर, कारण तुम्ही त्या वेळी घेतलेली काळजी फार आवडायची तुमच्या लाडक्या लेकिला .
घरी आले की तुम्हाला ही उत्सुकतेनं सांगावे कसा गेला पेपर आणि तुम्ही ही तितक्याच उत्सुकतेनं विचारावे.
किती किती गोड आठवनी ना ह्या बाबा
अलगद काळजात जीवनभर सांभाळून ठेवाव्या अश्याच!
कदाचित माझे मन तुम्ही दिलेल्या वात्सलेने अवघे आयुष्यभर भरलेच नसते;पण अवघे आयुष्य तर सोडाच बाबा,पण तुम्ही अचानक वादळासवे निघुन गेलात कधिच कधिच न परतण्यासाठी!
हा घाव मला पार कोसळून गेला.
ते न पेलणारे दुःखाचे डोंगर, तो विरह,तो आक्रोश,आजही ओल्याच आहेत त्या जखमा!
आयुष्यात कधिच न मनाला पटणारी गोष्ट म्हणजे बाबा तुमचे जाणे होय.
वादळ आले आणि निघुन गेले,सोबत माझ्या बाबाला ही नेले.सगळेच हरवले मी बाबा त्या वादळात!
पण एक सांगु का बाबा,
आधीपेक्षा ना तुम्ही माझ्या जास्त जवळ आहात.माझ्या प्रत्येक श्वासात,प्रत्येक आठवणीत.हवे तेव्हा मनातल्या मनात बोलू पाहते,अन जणू तुम्ही दाद द्यावी असा मृगजाळाचा भासही होतो बरं या कोवळ्या मनाला!
पक्षी उडून जावेत आणि नंतर त्यांच्या आठवणीच राहाव्यात असेच आयुष्यात घडून गेले.आज तुमच्या आठवणीचे पक्षी आयुष्यामध्ये मनात भिरभिरतात, जगण्याची वाट देतात आणि तुम्ही असल्याचा भास हलकेच मनात निर्माण करतात.
बाबा
प्रत्येक मुलीला ना बाबा तीचे बाबा खुप जास्त स्पेशल असतात.
माझे ही बाबा माझ्यासाठी खुप स्पेशल आहेत.
आजही आणि नेहमीच असणार!
कोणाचे बाबा शेतकरी असतात, कोणाचे डॉक्टर, वकील ,इंजिनिअर,अधिकारी, प्रत्येक जण आपल्या आपल्या परिस्थीतीतून आपल्या जीवनाची नौका पुढे करित आपल्या राजकुमारींचा लाड पुरवत असतात.
कोणती मोठी हवेली असो की, कोणाची छोटीशी झोपडी प्रत्येक घरामध्ये बापाची लेक त्याच्यासाठी त्याची राजकुमारी असते.
त्या राजकुमारीचा प्रत्येक हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न तिचे बाबा करीत असतात. आणि हे सर्व तुम्ही करायचे, माझा छोटासा हट्ट पुर्ण करण्यात तुम्हाला नकळत दिलेला त्रास आज मलाच मनात छळतो. ह्या सर्व हसण्या रडण्यात खुप आनंद होता.
मला खुप हसायचे होते,कधी रुसायचे होते बाबा तुमच्या सोबत,पण ह्या सगळ्या गोष्टी नियतीने दूर केल्यात माझ्यापासून,पण कोणत्याही काळाला तुमच्या माझ्या मनात असलेल्या आठवणी पासून दूर कधीच करता येणार नाही.
मनाच्या कोपर्यात बाप-लेकीचे विश्व मात्र मरेपर्यंत सोबत राहील...!
✍अॅड.विशाखा समाधान बोरकर
रा. पातुर जि. अकोला
08/09/2021
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
Adv Vishakha Samadhan borkar
www.babachilek.blogspot.com
-
सप्टेंबर ०८, २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)