शनिवार, १० एप्रिल, २०२१

स्त्री जीवनाचे उद्धारक क्रांतीज्योती म .ज्योतिबा फुले



उघडून दार शिक्षणाचे 
घडवली मोठी स्त्री क्रांती
स्त्री शिक्षणाचे तुम्ही प्रणेता 
धन्य धन्य तुम्ही क्रांतीज्योती
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे भारतीय इतिहासातले आद्य स्त्री समाजसुधारक , क्रांतिकारक., आपले विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारे ते बंडखोर, युगपुरुष दाम्पत्य होते. आपली वैचारिक मांडणी, लेखणीच्या कृतीतून त्यांनी अनेक आघाड्यांवर लढा दिला. जाती ,प्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी-कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी या सर्व अन्यायकारक रूढी वर त्यांनी संघर्ष केला.आज त्यांच्या संघर्षाच्या त्यागाने समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून त्या पुरुषाच्या बरोबरीने चालत आहेत .
आज महिलांची गगनचुंबी झेप फार कौतुकास्पद आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे श्रेय जाते ते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षणाची आराध्य देवता सावित्रीबाई फुले यांना . ज्यांनी स्त्री शिक्षणाचे बीज त्या कठीण काळात पेरुन आजच्या विशाल वटवृक्षाची उभारण्यात झालेली आहे .एवढा मोठा संघर्ष क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला, त्यामुळे आज आपल्याला ही परिस्थिती पाहता येते आहे .स्त्री हि कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही . प्रत्येक क्षेत्रामध्ये तिची झेप आहे. असे कुठेही क्षेत्र नाही, ज्यामध्ये स्त्रियांनी आपले अस्तित्व निर्माण केले नसतील. पण हे सगळे होत असतांना आजच्या स्त्रियांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श विसरता कामा नये.
त्या वेळी अनेक जुन्या रूढी-परंपरांना झुगारून नव्या क्रांतीचे मशाल हाती घेणे एवढे सोपे नव्हते.पण या सगळ्या गोष्टींचा विरोध झुगारून कार्य करून आपला संघर्ष सतत चालू ठेवून त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेत स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला.
ज्या स्त्रीचे चूल आणि मूल एवढेच सांभाळून आपले चार भिंतीच्या आतच अस्तित्व कोंडून ठेवण्यात येत होते, जिला घरातील कुठल्याच गोष्टीत बोलण्याचा अधिकार नव्हता, तीला नाना प्रकारच्या रुढी परंपरेत बंदिस्त करण्यात आले होते॰ या सगळ्या रूढी-परंपरांच्या बंधनांना तोडून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे स्त्रीयांसाठी खुले केले.त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे धर्म बुडाला अशी मान्यता होती.पण या सगळ्या गोष्टींना विरोध करत महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले.
महात्मा फुले यांनी पुणे शहरात बुधवार पेठेत मुलींसाठी शाळा काढली॰ त्या शाळेत सात मुली होत्या, ती फार दिवस चालले नाही नंतर तीन शाळा काढल्या होत्या. बुधवार पेठ, रास्ता पेठ या भागात शाळा काढल्या होत्या, त्या शाळेत अध्यापनासाठी एका शिक्षकाची गरज होती म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिकवुन अध्यापिका केले. सावित्रीबाईंनी शिक्षिका होण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. मुलीनी शिकू नये असा समाजाच्या रुढींचा प्रखर विरोध असताना कधी अंगावर शेन दगड झेलत त्या माउलीने तिचे कार्य चालूच ठेवले . एक शुद्र आपली पायरी सोडून असे वागते हे त्या काळातील उच्चवर्णीयांना सहन झाले नाही. पण जोतीरावांच्या माळी जातितील लोकांनाही हे आवडले नाही, या सर्वांनी जोतीरावांच्या वडलांवर दडपण आणले व पुढे पती पत्नीला घराबाहेर काढले पण हाती घेतलेले कार्य सोडून देण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी त्यांना शिक्षण विषयक कार्यात अत्यंत धैर्याने साथ दिली. घरचा आधार फुटल्याने फुले यांना उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र व्यवसाय शोधावा लागला. त्यामुळे त्यांनी कार्यशाळा काही दिवसासाठी बंद पडले आणि स्थिर झाल्यावर पुन्हा त्यांनी पुण्यात तीन शाळा काढल्या. .महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एका समाजाचे, एका पंथाचे, एका जातीचे नसून संपूर्ण समाजातील वाईट रूढी परंपरा विरुद्ध त्यांनी आपला लढा चालू ठेवला. विधवांचे केशवपन विरुद्ध मोहीम त्यांनी काढले .महात्मा ज्योतिबा फुले ब्राह्मण समाजातील विधवांचे केशवपण विरुद्ध झगडले. यांनी विधवांचे केशवपन करू नये असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले होते..फुले यांच्या काळी बालविवाहाची प्रथा होती साथीचे रोग येत , त्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुण बायका विधवा होतं या विधवांना वैविध्याचे जीवन जगावे लागे, या तरुण विधवा हरिदास, पुराणी किंवा कुणा नातेवाईकाच्या वासनेच्या बळी पडत त्या गरोदर राहत आपली समाजात बदनामी होऊ नये म्हणून जन्माला आलेल मूल कुठेतरी फेकून देत .महात्मा जोतीराव यांनी हे चित्र पाहिजे होते. म्हणून त्यांनी आपल्या घरीच हे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्यांनी आपल्या दारावर पाटी लावली होती. विधवानो येथे या सुरक्षितपणे बाळंत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल. या काळी त्यांना लोकहितवादी, रा .गो . भांडारकर ,बाबा परमानंद, तुकाराम तात्या, पडवळ यांचे सहकार्य लाभले.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुलबाळ नव्हते.वंशवेल कायम राहावी म्हणून दुसरे लग्नाचा त्यांना सल्ला त्यांचे वडील नातेवाईकांनी केला होता, पण त्यांनी धुडकावला. काशीबाई नावाची एक ब्राह्मण बालविधवा त्यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात बाळांत झाली होती. तिला पुत्र झाला त्याचे नाव यशवंत, त्याला फुले यांनी दत्तक घेतले त्या मुलाचे शिक्षण संगोपन केले, व शेवटी त्यांच्या नावे मृत्यूपत्र करून ठेवले .यशवंत डॉक्टर झाला ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मास आलेले यशवंत यांचे लग्न ही एक मोठी समस्या होती.हडपसरचे ग्यानबा कृष्ण ससाणे यांची मुलगी राधा यांच्याशी विवाह झाला. महात्मा ज्योतिबा फुले हे प्रखर विचाराचे क्रांतिकारी होते. अस्पृश्यांसाठी त्यांनी पाण्याची विहीर दिली. या दिवसात पाण्याची टंचाई जाणवली पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असत. हे विचार घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःची पाण्याची विहीर [हौद] अस्पृश्यांसाठी खुला करून दिला होता, त्या काळाचा संदर्भ पाहता ही बाब फारच क्रांतिकारक होती.
विधवांच्या प्रसूती बरोबर फुले यांनी अनाथ बालिकाश्रम चालवला . महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या सारसबागेत फुले यांनी पुनर्विवाह घडवून आणला होता. या उपक्रमात कधी सुशिक्षितांनी थोड्या प्रमाणात साथ दिली होती .बालविवाह बाला -जरठ विवाह, बहुपत्नीत्व, केशवपतन , आधी प्रथा वर महात्मा ज्योतिबा फुले यांनी कठोर हल्ले केले. बालविवाहाचे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट शब्दात मांडली होती. आपल्या वडीलधाऱ्या इष्ट मंडळीच्या सल्ला घेऊन आणि सर्व बाजूंनी सारासर विचार करून मुला-मुलींनी आपला जोडीदार निवडावा असे ते म्हणत . इ.स. १८८८ पासून ज्योतिबा फुले महात्मा म्हणून ओळखले जावू लागले, कारण कनिष्ठ वर्गासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. हंटर कमिशनला सादर केलेल्या निवेदनात त्यांनी विनंती केली होती की, स्त्रियांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणखी मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचा उपायोजना संमती द्यावी. शूद्र ,शेतकऱ्यांच्या दैन्यावस्था शिक्षणाचा अभाव हेच एकमेव कारण आहे, हे फुले यांनी आग्रहाने मांडले होते. यासंदर्भात त्यांनी पुढील काव्यपंक्ती प्रसिद्ध आहेत
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली!
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले 
इतके अनर्थ एका अविद्येने केले! 
महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक महाराष्ट्राच्या मूलगामी परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक मानले जातात. हिंदू समाजातील शूद्रातिशूद्रांच्या व्यथा त्यांनी बोलून दाखवला. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, इत्यादी ते जास्त वजनाच्या प्रश्न त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी न्याय व समता यावर आधारलेली आदर्श समाज प्रश्न सुधारण्याचा ध्येयवाद सिद्धांत सांगितला होता.
मानवाचे नैसर्गिक अधिकार हा महात्मा फुले यांचा सामाजिक विचारांचा केंद्रबिंदू आहे,ते मानवता धर्माचे एकनिष्ठ उपासक होते. त्यादृष्टीने त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरक झालेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा उद्घोष केला. ईश्वराने सर्व स्त्री-पुरुषांना एकंदर मानवी अधिकाराचे हक्क बहाल केले आहे असे ते मानतात. स्वतंत्र हा व्यक्तिमत्वाचा मूलभूत हक्क आहे. तो कोणत्याही एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही. सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रातील संबंधीचे आपले विचार व मते प्रत्येकाला व्यक्त करता आले पाहिजे असे मा. फुले यांना वाटायचे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाचा विविधांगी विचार केला. आपल्या लिखाणातून त्यांनी वेळोवेळी समाजातील रूढी परंपरा वर लेखणी स्वरूप शस्त्र उचलून घाव घातले. पुरुष लोभी दगाबाज पक्षपाती आहे, पुरुषांनी स्त्रियांना त्यांचे हक्क समजु दिले नाहीत, विद्या शिकण्यापासून त्यांना वंचित केले, असा फुले यांचा दावा होता. स्त्रीही त्यागी, प्रेमळ, कर्तव्यदक्ष आहे. ती नऊ महिने मुलाला वाढवते, त्याचे मलमूत्र काढते, मुलाचे लालन-पालन करते, मुला चालणे बोलणे शिकवते, सर्वांचे उपकार फिटणार पण तिचे नाही असा विचार ते मांडतात. त्याप्रमाणे निसर्ग सिद्ध मानवी हक्काचा उपभोग घेण्यास लायक पुरुषप्रधान संस्कृतीत निर्बंधामुळे मानवी हक्क नाही हा एक प्रकारचा सामाजिक अन्याय आहे .हिंदू धर्म शास्त्रकारांनी पुरुषांना अनेक सवलती दिल्या पण स्त्रियांवर मात्र अनेक बंधने लादली गेली, असे फुले म्हणतात .शेतकऱ्यांचा “असूड” या ग्रंथात महात्मा फुले यांनी शेती सुधारण्यासाठी अनेक उपाय योजना मांडल्या, त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, ते या सगळ्यात सामाजिक चळवळीच्या मध्ये सावित्रीबाई ह्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत होत्या. सावित्रीबाईंचे कार्य हे केवळ स्त्री शिक्षणा पुरते मर्यादित नव्हते. स्त्री शिक्षणाबरोबर अस्पृश्यतेविरुद्ध ही त्यांनी कार्य केलेले. त्यांनी महार वस्तीत स्वतंत्र शाळा काढली अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी घरचा हौद खुला केला, महिला सेवा मंडळ काढले होते व त्या स्वतः मंडळाचे सचिव होत्या. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून त्यांचा गौरव होत असते. शिक्षणाविषयी यांच्या उद्धाराचे कार्य सावित्रीबाईंनी खूप मोठ्या प्रमाणात केले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी खंबीरपणे सत्यशोधक समाजाचे कार्य मोठ्या हिमतीने चालू ठेवले. आपल्या काव्यातून त्यांनी शूद्र अतिशूद्र यांच्या अवस्थेचे चित्रण केले. समाजातील प्रश्नावर शिक्षण हाच उपाय आहे शिक्षणाने माणसातील पशुत्व नष्ट होते असा विचार त्या मांडतात.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी संपूर्ण आयुष्य आपले समाजासाठी वेचले आणि आज त्यांच्या कार्याचे फळ आपण सगळे आपला समाज प्रगतीच्या स्वरुपात पाहत आहोत . प्रत्येक समाजाच्या प्रत्येक बाजूला त्यांनी स्पर्श करून परिवर्तन त्या काळात घडवून आणले. त्यांचे लिखाण पाहता आजच्या काळातही त्यांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. स्त्री भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, या सगळ्या पदावर आरूढ होऊन तिने आपले अस्तित्व कोरले आहे असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे त्यांनी आपले अस्तित्व कोरले नाही. हे सगळं क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाचे फळ आहे.
आजची परिस्थिती पाहता स्त्रियांवर होणारे अत्याचार हे काही केला थांबत नाही आहेत, यासाठी सर्व स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले अस्तित्व आणखी प्रखर करून आपल्यावर आलेल्या संकटावर उभे राहून स्वतःचे संरक्षण करून, समाजासमोर नवीन आदर्श घेण्याची नितांत आवश्यकता आहे. हा समाजाचा आदर्श घडवून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर मार्गक्रमण केले जाते आहे अस म्हटल्यास हरकत नाही. त्यांनी लावलेले शिक्षणाच बीज आज मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालेले दिसत आहे पण आज आपल्या समाजातील वाईट व रूढी परंपरा स्त्रियांनी खंबीरपणे लढून जिंकले पाहिजे.या महान क्रांतीज्योतींच्या विचारांची क्रांती सदैव मनात तेवत ठेवली पाहिजे आणि हीच काळाची खरी गरज आहे . 
अॅड. विशाखा समाधान बोरकर 
रा. पातुर जि. अकोला 
11/04/2021

संदर्भ – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
प्राचार्य डॉ. एस. एस. गाठाळ