रविवार, ३० मे, २०२१

पुस्तक...

 

पुस्तक हातामध्ये पडल्यानंतर होणारा आनंद काही वेगळाच असतो.लहानपणी बाबा नेहमीच घरी पुस्तक आणायचे नवीन विषय, नवीन लेखक, सगळं वाचून झाल्यानंतर एक त्याच्यावर आमचं चर्चासत्र असायचं. बाबांना पुस्तकाचे विशेष आवड! पुस्तक वाचण्याची आवड भावंडांना सुद्धा ! पुस्तकप्रेमी घरामुळे घरामध्ये भरपूर पुस्तकं असायची. लहानपणी कळत नव्हतं हे लोक पुस्तकांमध्ये का इतके गुंतून जातात? तास न् तास हातामध्ये पुस्तक ठेवणे म्हणजे एक तपश्चर्याच नव्हे का? खुपच हुशार असतात ते लोक जे पुस्तक वाचतात असे मनोमन वाटायचं. घरामध्ये सर्व पुस्तक वाचायचे म्हणून मी काहीतरी नाटक म्हणून पुस्तक हातामध्ये घ्यायचे. सर्वांना कळावे की, मी पण पुस्तक वाचते म्हणून! बाकी अभ्यासाचेच पुस्तके जड जायचे तर बाकी पुस्तके वाचने दूरच !आताच्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की मनातच हलके हसू येते, आमचे लाॅचे पुस्तके पाहून आम्हाला म्हणणारे खूप लोक आहेत, बापरे ! किती मोठ-मोठे पुस्तक आहे हे आणि कधी वाचता तुम्ही!नकळत हसायला येतं.लहानपणी नाटक म्हणून हातात घेतलेले पुस्तक पुढे पुढे नकळत छान सवय होऊन गेली आणि पुस्तके मित्र बनली. एक घट्ट मैत्री होऊन गेली त्यांच्यासोबत कधी न तुटणारी !
पुस्तक हे कुठलेही असो कुठल्याही विषयाची असो ते ज्ञान देण्याचे काम करते पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान हे कधीच वाया जात नाही.पुस्तक वाचल्यानंतर माणुस वैचारिक होतो, त्याला चांगल्या वाईटाची जाणीव होते. सगळे जग तुमच्या सोबत भेदभाव करू शकेल; पण पुस्तक कधीही कोणासोबत भेदभाव करीत नाही ते सर्वांना सारखेच ज्ञान देते. त्यामुळे माणसाने नेहमी पुस्तक वाचले पाहिजे.

स्मशाने ही आता बोलकी झाली



स्मशाने ही आता बोलकी झाली
रडु लागली माणसांवर
रास लागली कशी इथे रे
काळ धावला जगण्यावर

भेटीगाठीची तूटली दोरी
सरणही न लाभे इथे कुणा
कुठे वाहती प्रेत हजारो
कुठे फेकती रस्त्यांवर

अश्रु वाहती क्षणोक्षणी
रोज हृदयावरी घाव नवा
उध्वस्त झाले घरे हजारो
वादळ दु:खाचे काळजांवर

निशब्द झाली रस्ते माणसे
निशब्द झालेय जगणेही
दूर जाहली माणसे अचानक
वेळ हातीही असल्यावर

जड झाली पावले आता
चालता वेदनेच्या काट्यांवर
जन्मभराची पायपीट कुठे
वेध लागले घरट्यांवर

सोकलेला चेहरा तो
मरणयातना भोगतोय रोज
मिळेल का गोळी कुठली
जड भाकरी सांजेवर

बंदिस्त विळखा काळाचा
प्रकाश कुठे ना दिसे इथे
कुठे असे रोज दिवाळी
कुठे निजती पाण्यावर


वेळ ही कठिण जरी
निघुन जाईल धीर धरा
धावून जा कठिण समयी
मिळुनी वार करू प्रसंगावर

✍ ॲड. विशाखा समाधान बोरकर
******************************************

सोमवार, १७ मे, २०२१

पुन्हा नव्याने पालवी फुटावी......!



सुकलेली पाने गळून जावी
पुन्हा नव्याने पालवी फुटावी
असेच घडो आयुष्यी आमच्या
सुखाची किरणे पुन्हा यावी..!

आव्हानांना पेलत पुढे जाऊन जिंकण्याची सवय माणसाला आहे , माणूस कधी घाबरला नाही कुठल्याही परिस्थितीत! संकटे आली आणि संकटे गेली तो मात्र सदैव परिस्थिती सोबत लढत राहिला.त्याचप्रमाणे हे कोरोना नावाचे संकटही काही काळापुरते आहे .संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत करून टाकणाऱ्या या व्हायरसने सगळीकडे हाहाकार करून टाकला.
अगदी सर्व सुरळीत चालू असताना अचानकच आलेल्या या वादळाला सामोरं जाणं इतकं सोपं नव्हतं तरीही माणूस त्याला धैर्याने सामोरे जात आहे. सुरळीत आयुष्य थांबल्या गेले, हातचा बेरोजगार गेला, लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. दुसऱ्या लाटेने तर हाहाकारच करून टाकला. डोळ्यासमोर आपली माणसे जात राहिली,आणि लोक निमूटपणे पाहत राहिली. ग्रामीण भागामधील दयनीय अवस्था डोळ्यांनाही बघवत नाही .ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटल आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने उपचारा अभावी लोकांचा मृत्यू होतो आहे.लोकांकडे पैसे नाही, खाण्यापिण्याचे डोळ्यासमोर भलेमोठे प्रश्न असताना या परिस्थितीसोबत लढने हे खूप मोठे आव्हान आहे. कुठल्याही व्यक्तीने हा कधीही स्वप्नामध्ये विचार केला नव्हता की अश्या परिस्थितीला त्याला सामोरे जावे लागेल म्हणून !
घरामध्ये राहून राहून मानसिक आरोग्य सुद्धा धोक्यात आलेले आहे . एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अगदी सहज रित्या पसरणाऱ्या कोरोनाला कुठल्याही प्रकारचे नियम न पाळल्याने ही वाढण्याचे काम काही महाभाग करीत आहे. कोरोणा आहे की नाही यावर होणारे विनोद सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेतल्याचे परिणाम हे आपणास दुसऱ्या लाटेच्या स्वरूपात दिसले .त्यांना झाला त्यांनी कोरोनाला सिरीयस घेतले आणि ज्यांना नाही झाला ते अजूनही विनोद करीत आहेत.
सरकार आणि नागरिकांनी जर वेळोवेळी सगळ्या उपाय योजना आणि नियमांचे पालन केले असते तर कुठेतरी अजूनही आपणास कोरोणावर यशस्वीरीत्या मात केल्याचे दिसले असते.ज्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही ते स्वतःच्या आरोग्यासोबत दुसऱ्यांच्या सुद्धा आरोग्यासोबत सुद्धा खेळत आहेत.हा जगण्या मरण्याचा खेळ कधी बंद होईल हा सामान्य माणसाचा निरागस प्रश्न!

एक झाले की एक संकटे मानवी आयुष्यावर येत आहेत .आधीच कोरोनामुळे खचलेला माणूस आणि त्यात पुन्हा नव्याने येत असलेल्या 'तौत्के' वादळाला सामोरे जाण्याची क्षमता माणसाने आणावी तरी कुठून ?अशावेळी नकारात्मकता ,जगण्यावर असलेल प्रेम कमी होण्याची शक्यता असते, पण जिथे मार्ग संपतो तेथून खरे आयुष्य सुरु करायचे ! न डगमगता ... ! कुठलीही वेळ ही कायम स्वरुपी नसते हे लक्षात असू दया. सद्या जरी मनात काहूरलेला अंधार आहे,पण उदयाला नक्किच नव्या आयुष्याचे किरणे घेऊन उगवणारी पहाट ही आपल्या आयुष्यात येईल..! ज्या प्रमाणे झाडाची सुकलेली पाने गळून पुन्हा त्याला नव्याने पालवी फुटते तसेच मानवी आयुष्यामध्ये हे कोरोना नावाचे संकट आणि हे येणारे वादळे जाऊन पुन्हा नव्याने आपल्या आयुष्यात सुखाची पालवी फुटेल...!

✍ ॲड. विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला
18/05/2021
*****************************************