शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

काळोख


दूर काळोखातुन आवाज येतोय
गुदमरलेल्या हुंदक्यांचा...
सूर्याची किरणे आजही तेथे गेलीच नाहीं
त्या भयावह काळोखाला दूर करायला..!
नि:शब्द भावना
नि:शब्द आक्रोश
नि:शब्द वेदना
दाखवून जातात काही
अव्यक्त जखमांचे व्रण..!
मनाला त्रास देणारा इथला भेदभाव
नेहमीच मानवतेवर हसून जाई..!
त्या काळोखाला सूर्य कधी दिसेल
हाच विचार अन्यायांच्या भिंती करू लागतात
वेदना कसल्या त्या
जग मान्य जगणेच ते!
जातीच्या भिंती ...
लिंग भेदभाव... 
गरीब -श्रीमंत
ह्या मिटल्या पाहिजेत पाट्या
आणि गिरवली पाहिजेत मानवतेची अक्षरे...!
रक्ताच्या रंगाला नाही रें भेदभाव
हृदय, श्वास, वेदना
सर्वांना सारख्याचं ना?
मग कशालाच हवीत हे
अमानवातेचे मुखवटे
शाळेच्या भिंतीत ही ...!
खरे तर तिथूनच प्रवास सुरु होतो
माणसा माणसात भेद करायचा..!
शाळा असावी माणूस घडवणारी
दिशा दाखवणारी
भेदभाव मिटवणारी
माणूसपण जगवणारी
पण ती हि धार्मिकतेची शाल पांघरून घेते
आणि पुन्हा बाल मनापासून
ही बीजे रुजायला लागतात..
घर, शाळा, समाज
इथेच घडतो खरा माणूस
आणि तो घडत जातो
म्हणून हा मनात दाटलेला अंधार
मिटला पाहिजे आधी इथूनच ...!
इथे मानवतेचा सूर्य उगवला पाहिजेत आधी..!
तेव्हाच प्रकाशणार समाज
मानवतेच्या छायेत 
भेदभाव विसरून..!
✍ऍड. विशाखा समाधान बोरकर
रा. पातूर जि. अकोला 
20/11/2022

सोमवार, १३ जून, २०२२

विकास हा सामान्य माणसांसाठी आभासी शब्द!



धगधगणारे रोजचे प्रश्न!
माणसांची प्रचंड गर्दी आणि गर्दीत हरवलेला अस्वस्त माणूस...!
सकाळी उठल्यावर जेवायला काय बनवायचं या प्रश्नाने लगबगीने कामावर गेलेली आई...
पोटात अन्नाचा कण नसतांना पहाटे पहाटे खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जंगलात रान वाटेने निघून गेलेला  बाप..
उकिरड्यावर पडलेला घाण कचरा आणि त्यात अन्न शोधणारी म्हातारी आजी, अंगावरचे फाटलेले कपडे, डोळ्यात आसवे आणि चेहर्‍यावर अनंत काळाची दुःख..!
काही चिमुकले  गाडीवर शाळेत जातात तर काही चिमुकले आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी हात पसरवतात..
उंबरठ्याबाहेर बाहेर पडायचे, पण सुरक्षेचा प्रश्न तिच्या अस्तित्वावर प्रश्न उचलतो, मनामध्ये धास्ती धरतो.
रोजचा मोठा रस्ता
प्रत्येकाचे आयुष्य,प्रत्येकाला दिसणार हेच वास्तव आहे.
कुठे भुकेची भयंकर आग आहे, कुठे भरपूर जेवण असून त्याची किंमत नाही..
हातामध्ये डिग्री, पण बेरोजगारीने हाताश तरुण इकडे  तिकडे फिरतो आहे व्यसनाच्या अधीन होऊन.
मुख्य प्रश्नांचा विचार सोडून दुसर्‍याच विषयावर बोलणे चालू आहे.
कोणत्याही धार्मिक स्थळाच्या वादापेक्षा ग्रंथालयाची जास्त गरज आहे.
कारण पुस्तक शिकवतात सर्वधर्म समभाव, ती शिकवत नाहीत कुठला भेदभावाचा धर्म.
विटा, दगड,माती, रेती या  गोष्टी ने बनवलेल्या वास्तूंवर आपण विश्वास जास्त ठेवतो; पण माणसाला माणसाच्या रक्ताच्या नात्यापेक्षा या वास्तूंच महत्त्व जास्त झालं!
दंगलीमध्ये अडकणारे नेहमी गरिबांची मुले असतात, अल्प शिक्षणामुळे आपल्या बुद्धीचा वापर करू शकत नाही आणि सहजरित्या यांना कोणत्याही कारणाने भडकवण  शक्य असतं, त्यामुळे कसातरी रोजगार मिळून पोटभर भाकर खाणारी ही मुलं नको नको त्या वादात नको त्या मार्गात लागतात. 

आज देशामध्ये पेटलेला भयंकर धार्मिक वाद हा आपल्या उद्याच्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.
इथे कितीतरी प्रश्न आ वासून उभे असतांना केवळ माणसाने माणसाच्या विरुद्ध धार्मिकतेचा विषय करून उभे राहणे हे कोणत्याही एक भारतासारख्या संवेदनशील मानवतेचा पुजारी असलेल्या देशातील जनतेला शोभणारी बाब नाही.
राजकारण करायचे, मुद्दे मांडायचे,वाद घालायचा तर मानवाला आवश्यक असणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा,  शिक्षण,आरोग्य या मुद्द्यांवर चर्चा करा. यावर राजकारण करा, बेरोजगारी सारख्या प्रश्नांवर राजकारण करा, तर ज्या गोष्टी देशाच्या बाधक आहेत, त्या गोष्टीच्या देशाच्या शांततेच्या बाधक आहे, त्या गोष्टीवर राजकारण करून कोणाचे भल होणार आहे? हा देखील साधा प्रश्न कळू नये याचे नवलच नव्हे का?
            खरे वास्तव तर हे आहे विकास हा केवळ आभासी शब्द झाला येथील व्यवस्थेचा. मुख्य प्रश्नांवर चर्चा होऊन या आभासी शब्दाची व्याख्या वास्तवामध्ये खऱ्या अर्थाने उतरावी इतकीच अपेक्षा एका सामान्य माणसाची असते. पण सामान्य माणूस  सामान्यच रहातो आहे शेवटपर्यंत दुर्लक्षित घटक म्हणून. तेव्हा आपण सामान्य ही स्वस्त भूमिका घेऊन बसण्यापेक्षा आपण आपल्या हक्कासाठी कृतीमध्ये लढू ही परिस्थिती बदलण्यासाठी एकत्र येणे महत्वाचे अन्यथा येणारी परिस्थिती याहीपेक्षा वेगळी असेल. आजच्या देशातील परिस्थितीचे भान  गांभीर्याने लक्षात घेता पावले उचलून दिशा शोधणे महत्त्वाचे आहे.
✍अँड.विशाखा समाधान बोरकर
रा. पातुर जि. अकोला

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

विचार व्हायला हवा!

उद्या पुन्हा काही क्षणासाठी का असेना आभासीच राष्ट्रभक्तीची झगमगाट दिसेल,
प्रत्येक स्टेटसला, प्रत्येक प्रोफाईल ला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिसतील.
कारण 26 जानेवारी म्हटला की आमचा प्रजासत्ताक दिवस राष्ट्रीय सण असतो बरं का! 
आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत जातो अन संपतो अवघा दिवसच! 
छान गेला शुभेच्छा देत देत आपला प्रजासत्ताक दिन म्हणून आनंद व्यक्त करतो.आणि केवळ शुभेच्छा देण्यात फोटो काढण्यात वेळ घालवतो.पाहिले तर तिथेच 
आपले राष्ट्रीय कर्तव्य अधांतरी ठेवतो .
दुसरे दिवशी मात्र सर्वजण आपापल्या कामाने लागतात,पुन्हा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाची वाट पाहत.

ज्या महामानवांनी आपल्याला ही सुवर्ण दिवस आयुष्यामध्ये आणण्यासाठी अवघे आयुष्य झटले त्यांच्या स्वप्नातील देश मात्र आम्हाला पुन्हा नव्याने उभे करण्याचे भानच राहिले नाही मुळात!
आम्हाला दिसतील ही कसे ती अनेक प्रश्न! आम्ही तर केवळ आमच्याच विश्वात अगदी मग्न होऊन गेलो आहोत.
आम्हाला दोन वेळचं जेवण मिळतं, आम्हाला हवे तेव्हा कपडे मिळतात,आम्हाला हव्या त्या गोष्टी वेळेवर उपलब्ध होतात;पण त्याही पलीकडे आम्हाला त्या रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गरीब,उपाशी,थंडीने गारठलेल्या लोकांनाकडे पाहून त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची गरजच नाही वाटत कधी! 
आम्ही प्रजासत्ताक दिवस,स्वातंत्र्य दिवस साजरा तर करतो; पण आपल्या देशामध्ये असलेले भेदभाव जातिभेद,वंशभेद,रंगभेद,नको त्या रुढी-परंपरा याच्यावर बोलण्याचे आम्हाला त्या त्या दिवशी खरच गरज नाही का वाटत?
वरे कितीही चांगल्या वाटणारया गोष्टी दिसल्या आपल्याला तरी कितीतरी समस्यांनी आतून पोखरत चाललाय आपला देश. 
उद्याचा प्रजासत्ताक दिवस येईल आणि जाईल पण तो शेतकरी जो रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये खूप खूप राबराब राबतो त्याचे दिवस कधी बदलतील?आजच्या युवा पिढीच्या बेरोजगारी चे प्रश्न कसे सुटतील ?प्रत्येक क्षणाला बलात्काराला बळी जाणार्‍या पीडिता यांचा जीव कधी वाचेल?रस्त्यावर आपल्या पोटभर जेवणासाठी हात पसरणारे लहान चिमुकले हात कधी थांबतील?
खूप खूप प्रश्न आहेत,समस्या आहेत ज्या प्रत्येकाला माहीत आहे; पण यावर बोलायला सध्या कोणी तयार नाही,कारण प्रत्येकाला केवळ स्वतःच्या पलीकडे जायलाच वेळ नाही हीच मुळात शोकांतिका. 
मला नेहमी वाटत प्रजासत्ताक दिवस साजरा करीत असताना आपल्या देशातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये कोणतेही निरागस बाळ उपाशी नसेल, कुठल्याही व्यक्तीला जातिभेदाने मारल्या जाणार नाही, बेरोजगारी ने कोणताही युवक आत्महत्या नाही करेल,प्रत्येक क्षणाला प्रत्येक मुलगी, महिला सुरक्षित असेल,वंशभेद, जातीभेद रूढी परंपरा या सर्व भेदभावाला नाहीसे करुन केवळ मानवतेचे तेथे वारे वाहिल्या जातील. येथे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायावर उभी असलेली खरी समानता असलेली लोकशाही इथे नांदेल.कोणत्याही व्यक्ती वा समूहाच्या मूलभूत हक्काची पायामल्ली येथे होणार नाही, प्रत्येकाला आपल्या संविधानिक कर्तव्याची जाणीव असेल.ही सर्व वाटणारी परिस्थिती कधी निर्माण होईल हाच मोठा प्रश्न! केवळ शुभेच्छा न देता आपल्याला आपल्या देशातीच्या प्रगतीच्या आड येणार्या अडचणी समस्या यावर ही बोलले पाहिजे त्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन लढले पाहिजे.प्रजासत्ताक दिनाला आपल्या हातात तिरंगा घ्यायला पैसे असतील पण बाजुला उभ्या उपाशी लहानमुलाकडे पाहुन तुम्हाला त्याची भुक दिसत नसेल तर काहीच अर्थ नाही त्या मुलासाठी त्या सणाचा,कारण तो कालही उपाशी होता आजही आहे,आणि उद्याच्या भाकरीची चिंता मनात आहे त्या चिमुकल्याच्या,मग काय तर आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करित आहोत.या सर्व प्रश्नांवर प्रत्येक भारतिय व्यक्तीने विचार करायला हवा इतकेच!

✍अॅड.विशाखा समाधान बोरकर 
रा.पातुर जि.अकोला 
25/01/2022

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

समीक्षण पितृप्रेमाची कारुण्यपूर्ण कहानी - आभाळमाया



समीक्षण

'मूलं आईच्या चरणावर प्रेम अर्पण करतात
बाबांपासून मात्र चार हात लांबच राहतात
आईवर त्यांना खूप कथा कविता सुचतात
बाबासाठी त्यांच्याजवळ शब्दही नसतात...'
अज्ञात कवीच्या या ओळींना अपवाद आहे ॲड विशाखा बोरकर ही नवोदित कवयित्री, लेखिका. आपल्या प्रिय बाबांच्या नितांत सुंदर, निखळ, नितळ प्रेमाचा अतिशय हृदय आठव 'आभाळमाया' या कादंबरीतून लेखिकेने शब्दबद्ध केला आहे. आता आताच एल. एल. बी. चे शिक्षण आटोपून वकिलीला सुरुवात करणाऱ्या या युवा लेखिकेने अगदी प्रारंभालाच जवळपास दोनशे पानांची कादंबरी लिहून साहित्याच्या प्रांतात दमदार पाऊल टाकले आहे. या अगोदर तिचा 'बंदिस्त रुढीच्या विळख्यात' हा कवितासंग्रह अगदी अलिकडेच प्रकाशित झाला आहे. या कवितासंग्रहाच्या मनोगतात 'कवितेचे बाळकडू मला बाबांकडून मिळालं' असे कवयित्रीने सांगितले आहे. तिचे बाबा कवी हृदयाचे, शांत, सोज्वळ, कुटुंबवत्सल व्यक्ती होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आदर्श होते. 
या कवयित्री, लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वावर तिच्या बाबांचा अमिट ठसा आहे. ज्यांनी तिच्यावर अलोट प्रेम केले. ज्यांनी बालपणापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तिच्यावर उत्तम संस्कार केले. निगर्वी साधेपणाचे आणि सत्शीलतेचे बीजारोपण केले. तिचे अतिसंवेदनशील, नाजूक, हळवे मन जपले. तिच्या डोळ्यातील आसवांना तळहातावर तोलून तिला खुदकन हसवले. तिच्या ओल्या पापण्यांमध्ये हिरवे स्वप्न भरले. हेच तिचे प्रिय प्रिय बाबा ती बारावीत असताना कॅन्सरच्या दुर्धर आजाराने हे जग सोडून गेले.
आयुष्यातल्या या प्रचंड वादळाने तिला पुरते उद्ध्वस्त केले. पितृत्वाची ही घनदाट छाया अचानक नाहीशी झाल्याने ती सैरभैर झाली. तिची जगण्याची उमेद संपून गेली. हा हादरा तिला सहन करण्यापलिकडचा होता. बाबा शिवायच्या जगण्याची कल्पनाही ती करू शकत नव्हती. क्षणोक्षणी तिला बाबा आठवत होते. ती उदास राहू लागली. आजारी पडू लागली. एकाकी झाली. या प्रसंगी तिच्या कुटुंबाने तिला खूप आधार दिला. तिचे मन जपले. पण तिला या धक्क्यातून बाहेर येणे कठीण जात होते. जगण्याचा रेटा म्हणून तिच्या भावाने तिला बारावीनंतर एल.एल.बी.ला ऍडमिशन घेऊन दिली. कॉलेज सुरू झाले पण तिचे मन रमत नव्हते. तिला घरादारात बाबा दिसायचे. बाबा गेल्याने खचून गेलेल्या आईकडे पाहून ती कॉलेजला जाऊ लागली. पण वर्गात तिचे मन लागेना. ती सारखी बाबांच्या आठवणीतच रमलेली असायची. तिला फार असह्य वाटायचे. यातून मार्ग शोधण्यासाठी तिचे मन धडपडू लागले आणि ती बाबांच्या आठवणी लिहू लागली. लिहिण्याची सवयही बाबांनीच लावली होती. रोज काहीतरी लिहिले पाहिजे या बाबांच्या सल्ल्यानुसार ती रोजनिशी लिहू लागलेली. त्यामुळे या आठवणींना शब्दात मांडणे तिला जमू लागले. बाबांच्या सानिध्यात राहण्याचा नवा मार्ग तिला गवसला होता. पहिल्या सेमिस्टर नंतरच्या दिवाळीच्या अवघ्या पंधरा दिवसांच्या सुट्ट्यात तिने रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागून बाबांच्या आठवांचा जो जागर केला तो जागर म्हणजे ही 'आभाळमाया' ही कादंबरी.
लेखिका विशाखा बोरकर ही अतिशय हळव्या, सुकोमल मनाची सालस मुलगी आहे, असेच या लेखनावरून दिसून येते. अतिशय निरागसपणे तिने बाबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तरल संवेदनशील मन लाभलेल्या लेखिकेने तिच्या विशिष्ट स्वभावानुसार जीवनाचा जो अनुभव घेतला त्याचे प्रकटीकरण या कादंबरीत आहे. या अनुभवात प्राधान्य आहे वडिलांच्या आठवणींना. अंतःकरणातील सारा जिव्हाळा ओततं तिने हे लेखन केले आहे. नव्हे हा जिव्हाळा, हे प्रेम आणि हे आपलेपण हा तिच्या जगण्याचा स्थायीभाव आहे. तो केवळ तिच्याच नाही तर तिच्या कुटुंबाचा स्थायीभाव आहे. आणि याला कारण आहे तिचे बाबा. अतिशय निष्कलंक, निस्वार्थी शांत, संयमी असणाऱ्या समाधान बोरकर या बाबांचे व्यक्तित्व खरोखरच त्यांच्या नावाप्रमाणेच समाधानी वृत्तीचे होते. कौटुंबिक स्नेह जपणारे ते कुटुंबवत्सल पिता होते, पत्नीचा सन्मान राखणारे आदर्श पती होते. चार मुलं आणि चार मुली अशा मोठ्या परिवारातही त्यांनी सर्व लेकरांना लाडाकोडाने वाढवले, त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. डॉ आंबेडकरांच्या कार्याची आठवण करून देत त्यांनी नेहमी लेकरांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शोषित वंचितांना, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. लेखिका लिहिते, 'बाबांनी आयुष्य समाजसेवेसाठी वाहिले होते. कापसाला भाव मिळण्यासाठी त्यांनी शेतकरी वर्गाच्या सोबत अनेक आंदोलने केली. शेतकरीवर्गाच्या विकासाच्या हितार्थ शेतकऱ्यांच्या परिषदा आमच्या शेतामध्ये भरवल्या जायच्या. त्यामध्ये मोठ्या मोठ्या तज्ज्ञांना, शेती मातीच्या अभ्यासकांना या परिषदेमध्ये बोलावले जायचे. त्या परिषदांत दूरवरून लोक सहभागी व्हायचे.' आपल्या शांत, सोज्वळ, ॠजू स्वभावाने त्यांनी माणसं जोडली होती.
आठ भावंडे,आजी-आजोबा‌ अशा मोठ्या कुटुंबात लेखिकेला सर्वात जवळचे अगदी आई पेक्षाही जवळचे बाबाच वाटायचे. या कादंबरीच्या मनोगतात ती म्हणते, 'आम्हा आठ भावंडांमध्ये बाबांचा सर्वात जास्त जीव माझ्यात होता. मी त्यांची सर्वात लाडकी मुलगी होते.' बालपणी काऊचिऊच्या गोष्टी सांगत घास भरवणारे, थोपटून झोपवणारे, बोट धरून चालायला शिकवणारे, पडलं की खरचटण्यावर प्रेमाने फुंकर घालणारे मातृहृदयी बाबा तिला खूप खूप प्रिय होते. बाबांबद्दल या कादंबरीत ती एके ठिकाणी ती म्हणते, 'लहानपण पूर्ण माझ्या बाबांशी जुळलेलं होतं. कोणी बोलले तर बाबांना सांगेल अशी धमकी मी घरात सर्वांना द्यायची. काही दुखले खुपले की सर्वात आधी बाबांना सांगायचे. कशात नंबर आला की सर्वात आधी बाबा आठवायचे.' हळव्या मनाच्या लेखिकेला कोणत्याही गोष्टीसाठी पटकन रडू येते. ती रडली की तिचे बाबा म्हणायचे,'तुझ्या डोळ्यात तलाव आहे का? जेव्हा पाहावं तेव्हा रडत असते?' आपल्या या भावूक मनाला आपली कमजोरी करण्यापेक्षा आपले सामर्थ्य बनवून 'आभाळमाया' सारखी पितृप्रेमाची महामंगल गाथा तिने साकार केली आहे. अंतःकरणातील संपूर्ण जिव्हाळा ओतून तिने हे लेखन केले आहे. वडिल आणि लेकीच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, ममत्व अनेक घटनाप्रसंगातून लेखिका सांगत जाते तेव्हा सगळ्यांना हा आपलाच अनुभव वाटतो. लेखिकेची सांगण्याची पद्धत अतिशय साधी आणि सरळ असली तरी यातील कारुण्याने ते थेट वाचकाच्या हृदयाला भिडते. 
या कुटुंबातील आई-वडील फार सोशिक, समजदार आहेत. रोजच्या साध्या साध्या प्रसंगातून ते मुलांना जीवनबोध देतात. फुलपाखराला पकडून त्रास देऊ नये, प्राणीमात्रांवर प्रेम करावे, शेतशिवारात कष्ट करण्याची लाज बाळगू नये, आल्या गेल्याचा सन्मान करावा, कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सोडून नये, अडल्यानडलेल्यांना मदत करावी, समाजोपयोगी कार्य करावी अशी कितीतरी जीवनमूल्ये ते लेकरांमध्ये रुजवतात. शेतकऱ्याच्या घरातील कामांची घाईगडबड याही घरात असली तरी ते मुलांशी संवाद करतात, मुलांशी खेळतात. एकदा तर सारे कुटुंब पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतात, हा प्रसंग लेखिकेने फार खुलवून सांगितला आहे. लेखिकेला सुरवातीला शाळेत जायला आवडत नसते तेव्हा एकदा आईने तिला मारले होते. या व्यतिरिक्त हे आई-बाबा मुलांना रागवताना, मुलांवर चिढताना, त्यांना मारतांना दिसत नाहीत. एके ठिकाणी लेखिका सांगते, 'काॅलेजमधून थकून घरी आले की बाबांनी माझा सुकलेला चेहरा पाहून म्हणावे, 'चेहरा सुकून गेला पोरीचा. बेटा जेवण कर बरं आधी.' आईने म्हणावं, 'आली का विशू?' तिच्या नजरेतले वात्सल्य सारा शिण घालवायचे. ते तिच्या अभ्यासाची विचारपूस करायचे. काही हवं नको विचारायचे. बाबा बऱ्याचदा बोलताना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे. सर्वांशी प्रेमाने वागण्याचा सल्ला द्यायचे. अशा छोट्या छोट्या घटनाप्रसंगातून लेखिकेने कौटुंबिक सौहार्द खूप छान व्यक्त केला आहे. माझ्या कुटुंबातील प्रेमळ वातावरण माझ्या मैत्रिणींनाही आवडायचे, असेही तिने एके ठिकाणी म्हटले आहे. लेखिका अगदी सहजतेने हे सांगत जाते तेव्हा वाचकांवरही या जीवनमूल्यांचे संस्कार होत जातात आणि वाचकमनाचे उन्नयन होते. हे सारे वाचताना न कळत साने गुरुजींच्या 'श्यामची आई' ची आठवण येते. या कादंबरीलाही 'श्यामची आई' प्रमाणे गौरव प्राप्त व्हावा असे मनापासून वाटते. 
विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील पातुर या छोट्याशा गावातील हे शेतकरी कुटुंब असल्याने ग्रामजीवन, ग्राम संस्कृती आणि शेतकऱ्यांचे कष्टमय जगणे या कादंबरीत आले आहे. त्यामुळे ही कादंबरी देशियतेचा साज धारण करते. कधी महापूर तर कधी अवर्षण यात पिचलेला शेतकरी, शेतीकामाची लगबग, पेरणीच्या हंगामातील तारांबळ, पावसाळ्यात गळणारे टिना-कौलाचे घर, आर्थिक ओढताण, हाती पैसा नसतानाही मजुरांची आर्थिक नड भागविणारे लेखिकेचे बाबा, भल्या पहाटे लगबगीने घरचे काम आटोपून शेतावर जाणारी आई, आईबाबा घरी नसताना मोठ्या भावंडांनी लहान भावंडांना सांभाळणे, आई-बाबाना यायला उशिर झाला की सर्व भावंडांनी दाराशी बसून आईबाबाच्या येण्याची आतुरतेने वाट पहाणे, आईबाबांनी लेकरांना छातीशी कवटाळणे अशा अनेक प्रसंगांतून शेतकरी जीवनातल्या अनेक व्यथा, विवंचना आणि प्रेम, सौहार्दही लेखिकेने फार आत्मियतेने मांडले आहे. 
हे कुटुंब अधूनमधून शेतातल्या घरी एक-दोन दिवसांसाठी राहायला जायचे. मूलांना आणि विशेषतः लेखिकेला शेतात राहाणे खूप आवडायचे. शेतातला निसर्ग, दिवसभर शेतात फिरणे, सापा-विंचवांचा सामना करणे, बाबांनी पोरींना शेतशिवाराची माहिती सांगणे, मायमातीचे ॠण व्यक्त करणे असे शेतजीवनाचे अनुभवही लेखिकेने ओघवत्या शैलीत मांडले आहे. एकदा खूप पावसामुळे नदी-नाले एक होऊन पूर आलेला. तिचा शेतात गेलेला मोठा भाऊ शेतातच अडकला. मुलगा घरी कसा येईल आई-बाबांना काळजी लागून राहिलेली. बाबा शेतात जायला निघाले. अर्ध्या वाटेवर पुरातून बैलगाडी काढत मुलगा येताना दिसला. बाबांना बरे वाटले. ते गाडीत बसायला गेले तर लेखिकेची मोठी बहीण अलका गाडीत दिसली. 'एवढ्या पुरात तू कशी आली?' पित्याने विचारले, तर 'तुम्ही पुलावरून येत असताना मी नदीतून आले', असे उत्तर तिने दिले. भावाच्या काळजीपोटी ही बहीण जीव धोक्यात टाकून भावापर्यंत पोहोचली होती. असे हे प्रेम, आपुलकी आणि आत्मियतेने भारलेले कुटुंब. लेखिकेची कथनशैली तर वाचकाला गुंगवून टाकणारी आहे.
सामाजिक उच्चनिचतेचे कडू घोट अजूनही समाजातील कनिष्ठ जातींना गळ्याखाली उतरवावे लागतात. एक प्रसंग लेखिका सांगते, 'दुपारच्या वेळी एक बाई बांगड्या घेऊन दारा समोरून जात होती. आईने त्या बाईकडून बांगड्या घेतल्या आणि 'भर उन्हात फिरत आहेस, पाणी पाहिजे का?' म्हणून विचारले. घरात जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आली. त्या बाईने पाणी पिण्याअगोदर आईला जात विचारली. आईला तर वाईट वाटलेच पण लेखिकेच्या बालमनावर यांचे चरे उमटले. बाबांनी 'जातीपातीच्या भिंती पाडून समाजात माणुसकीचे नाते निर्माण केले पाहीजे. आपण या अज्ञानी लोकांना समजून घेऊन सौहार्द जपला पाहीजे', असे बोलून दाखविले तेव्हा लेखिका त्या अल्लड वयातही, 'मी या भिंती पाडण्यात अग्रेसर राहील' असे आश्वासन बाबांना देते. बाबांना आपल्या लेकीचे खूप कौतुक वाटते. बाबा तिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवत समाजोपयोगी कार्य करण्याचा सल्ला देतात. 
विशाखा बोरकर ही कवी मनाची लेखिका आहे, याचा प्रत्यय या कादंबरीतून वारंवार येतो. 'अंधार्‍या रात्री शरदाचं टपोरं चांदणं होतं. त्या टिमटीम लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहून जणू आकाशात मोती जमा झाले असावे असा भास माझ्या मनाला व्हायचा. मी त्या चांदण्यांच्या विश्वात डुबलेले त्या चांदण्यांना न्याहाळत होते. तेव्हा खरच एक प्रश्न मनात निर्माण व्हायचा. जर रात्र झालीच नसती तर एवढ्या सुंदर चांदण्यांचे दर्शन कसे झाले असते?' अशी काव्यात्म वर्णनं या कादंबरीत बरीच आहेत. तिच्या बाबांच्या निधनाने तिच्या मनाची झालेली सैरभैर अवस्था, स्वप्नात, जागृत, अर्धजागृत अवस्थेत बाबांशी केलेला संवाद वाचकांच्या डोळ्यात पाणी आणतो. 'बाबा, नेहमी तुमच्याबद्दल दुःखाने आलेला हुंदका मी मनातच दाबून ठेवते. पण तेही मनच आहे, जे खूप चंचल आहे. ज्या मनाला मी कधीच रोखू शकणार नाही. या मनाला माहीत आहे सर्व. तरी हे मन तुमच्या येण्याची कोरडी वाट का पाहते? हे डोळे का शोधत राहतात तुम्हाला? तुमचा फोटो पाहिला की तुम्ही माझ्याकडे पहात आहात असे मला वाटते.' हे वाचून डोळे भरून येणार नाही असा वाचक विरळाच. कादंबरीच्या शेवटच्या काही प्रकरणात बाबांचे आजारपण, त्यांना जगविण्यासाठी कुटुंबाचा चाललेला आटापिटा, बाबांचे धिरोदात्तपणे आजाराला सामोरे जाणे, लेखिकेला होणारे असह्य दु:ख, बाबाशिवाय मला जगायचेच नाही म्हणून आलेला आत्महत्येचा विचार, साऱ्याच कुटुंबाचे कोलमडून पडणे, बाबांच्या मृत्यूनंतरची लेखिकेची विकलावस्था अशा कारुण्यपूर्ण वातावरणाला लेखिकेने आपल्या शांत, संयमी लेखनीने दिलेले शब्दरूप वाचताना न कळत डोळे पाणावू लागतात. करुणरसाचा परमोत्कर्षच आहे या शेवटाच्या प्रकरणांत. 
लेखिकेच्या प्रामाणिकपणाचे आणि निरामयतेचेही दर्शनही कादंबरी वाचताना हरघडी होते. जंगलातून शेतात जाताना बाबांनी दाखविलेला उडणारा मोर सर्व भावंडांना दिसला पण तिला नाही दिसला. हे तिने कादंबरीत मोकळेपणाने सांगून टाकले. बारावीच्या परिक्षेत एका पेपरला अबसेंट राहूनही ग्रेस मार्क मिळून तिचे पास होणे तिने कुठलाही आडपडदा न ठेवता ती सांगते. एवढा प्रामाणिकपणा भल्याभल्यांनाही जमत नाही. म्हणून या लेखिकेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
या कादंबरीचे मुखपृष्ठ आतील आशयाला तोलून धरणारे आहे. चांदण्या रात्रीचे विलोभनीय सौंदर्य न्याहाळणारी सौंदर्यदृष्टी लाभलेले बाबा आज या रुपेरी काळोखात अंतर्धान पावले असले तरी आभाळमाया होऊन ते आपल्या लाडक्‍या लेकीच्या आयुष्याला प्रकाशमान करणार आहेत नव्हे तसे त्यांनी केलेलेच आहे, हा समर्थ आशय व्यक्त करणारे मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी मोठया कल्पकतेने काढले आहे. शक्यता आणि अशक्यतेच्या हिरवट, काळपट पार्श्‍वभूमीवर तेजाळता चंद्र आणि तारका, तसेच बाबांच्या स्नेह आशिषात प्रकाशमान झालेली लेक, असे हे मुखपृष्ठ पाहता क्षणीच रसिक, वाचकांचे मन मोहून घेते. मराठी साहित्यातील जेष्ठ, श्रेष्ठ लेखिका डॉ प्रतिमा इंगोले ह्यांनी या कादंबरीच्या मलपृष्ठावर लेखिकेची पाठराखण केली आहे. डॉ प्रतिमा इंगोले सारख्या मराठी साहित्याच्या जाणकार लेखिकेचा आशीर्वाद ही मिळकत लेखिकेने पदार्पणातच मिळविली आहे. विशाखा बोरकर या लेखिकेचे भविष्य उज्ज्वल आहे, याचेच हे सुचिन्ह आहे.
एकूणच लेखिकेला आरंभीच हाती घेतलेला हा कादंबरीचा मोठा पट लिलया पेलता आला आहे. खरेतर कादंबरी लिहावी म्हणून तिने हे लेखन केलेच नाही. केवळ स्वतःच्या सांत्वनासाठी आणि बाबांच्या आठवणी शब्दरूपात केवळ स्वतःसाठी जतन करून ठेवाव्या म्हणून तिने डायरीत लिहिलेले हे लिखाण आहे. यातील झळाळत्या जीवनमूल्यामुळे अनेक सहृदांनी सल्ला दिला आणि या आठवणी कादंबरी रूपात साकार झाल्या. त्यामुळे कुठलीही कशिदाकारी न केलेल्या तरीही अस्सल सौंदर्याचे देखणेपण घेऊन मराठीच्या साहित्य प्रांतात दाखल झालेल्या या रसरसीत साहित्यकृतीचे मनस्वी स्वागत आहे.

- @ डॉ प्रा सुनंदा बोरकर जुलमे,
नाईक नगर, नागपूर .
मोबा. ८७६६४२२४७५.

'आभाळमाया' कादंबरी
लेखिका-अॅड.विशाखा समाधान बोरकर 
प्रकाशन-परिस प्रकाशन,पुणे
मुखपृष्ठ-अरविंद शेलार
मुल्य-300

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

या पिढीला नावे ठेवण्याआधी......



अलीकडे आजच्या युवा पिढीला नावे ठेवण्याचा फारच मोठा सुर आहे. जो तो या पिढीला नाव ठेवत बसतो.आजच्या पिढीला वास्तवाचे भान नाही , आजचे मुल मोबाइलवर गुंतलेले आहेत,वैगेरे वैगेरे... वास्तविक पाहता हे सगळे प्रश्न जरी खरे असले तरी या पिढीला ज्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे त्या गोष्टीचा विचारही करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे विस्कटलेली शैक्षणिक परिस्थिति,ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक नुकसान झालेले विद्यार्थी ह्या सर्व परिस्थीतीला विद्यार्थ्यांना कश्या प्रकारे तोंड द्यावे लागते आहे याची कोणी कल्पना देखील करु शकत नाही .सद्याची निर्माण झालेली परिस्थिती ही एकाच वेळी निर्माण झालेली नाही.ज्या प्रमाणे या मुलांना दोष देण्यात येतो त्याला जबाबदार कुठेतरी तुम्ही सुद्धा आहात. देशामध्ये शिक्षणाचे करून ठेवलेल बाजारीकरण होतकरू हुशार; पण परिस्थीतीने गरिब या शापामूळे मुलांच्या आयुष्याचे बारा वाजत आहे. एकिकडे सरकार शिष्यवृत्ती तर देते, पण ती शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नाहक त्रास ही तितकाच देण्यात येतो. वेळेवर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात कामी पडेल असेही नाही. ती शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा वेळा चकरा माराव्या लागतात ही असणारी परिस्थिती आहे. गरीब-श्रीमंत, जातीभेद, धर्मभेद, वंशभेद, लिंगभेद, वर्णभेद, प्रांतभेद,ही जेवढी मानवतेच्या आड येणारे भेदभाव आहे ते आजच्या पिढीने तर निर्माण केलीली नाहीस ना? ही भेदभावची भेट तर कितीतरी युगापासून चालू आहेत, एका पिढीकडुन दुसर्या पिढीला वारसा देत जावा असाच हा भेदभावचा वारसा सुरु आहे हे येथिल वास्तव आणि हेच येथिल काही धर्माचे रुढी परंपरेचे ठेकेदार आजच्या युवा पिढीच्या मनात वैचारिक धार्मिकतेचे विष पसरवून पुढे ठेवत आहेत याला दोषी वा गुन्हेगार कोण आहे? शाळा शिक्षणाच्या वयामध्ये घराच्या जबाबदारिचे भार डोक्यावर तर एकिकडे शिक्षणाची स्वप्न खुणावत असतात.डोळ्यात उद्याच्या भविष्याची स्वप्न मनात असतात हे सर्व असताना शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर कितीही उंचावले तर त्या गुणवत्तेला योग्य न्याय दिल्या जात नाही.आपल्या ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी व गणित ही दोन विषय अजूनही जीवघेणी ठरतात.तेवढ्या दोन विषयाच्या भीतीमुळे आमची मुलं शाळेत जाण्याचे टाळतात. मराठी मुलांना इंग्रजी का येत नाही हा एक संशोधनाचाच मुद्दा आहे. जर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून खरे विद्यार्थी घडवण्यासाठी परिश्रम घेतले तर ग्रामीण भागातील मुलांना ह्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येत नाही.शहरी भागामध्ये उच्चशिक्षणासाठी गेलेल्या मुलांना आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी तडजोडी करून आपले शिक्षण पूर्ण करावे लागते. पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी कितीतरी प्रश्नांना सामोरे जावे लागते. उपाशीतापाशी दिवस काढावे लागतात तेव्हा जाऊन खूप मेहनतीनंतर ती नोकरी त्यांना मिळते.आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये तीनशे जागांसाठी लाखो विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात येतात यावरून आपल्याला अंदाज येईल की आपल्या देशामध्ये किती मोठी बेरोजगारी आहे. आजच्या युवा पिढीने बेरोजगारीने इतके पोखरले की शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी चार पाच वर्षे लागतात. घरी शिक्षणासाठी लावलेला पैसा विद्यार्थ्यांना दिसतो. त्यामुळे त्यांना नैराश्याला सामोरे जावे लागले.बेरोजगारी मधून कितीतरी युवक आज आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत.आज आपल्या देशामध्ये ज्या डोके भडकणार्या सगळ्या विषारी गोष्टीचा पसरवण्यात येत आहेत त्या ऐवजी या प्रश्नांवर जर बोलले गेले तर खरंच आजच्या युवा पिढीला कुठेतरी सांभाळून पुन्हा नव्याने उभे राहण्याच बळ प्राप्त होईल.आजच्या युवा पिढीच्या हातामध्ये जातीभेदाच्या मशाली देण्यापेक्षा मानवतेच्या क्रांतीच्या मशाली देवून एक सामाजिक समानतेवर आधारित समाज निर्माण करने गरजेचे आहे.धार्मिक वंशपरंपरेचा अभिमान बाळगण्यापेक्षा मानवता या गोष्टीचा अभिमान बाळगून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील होणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि या प्रयत्नामधूनच एक सशक्त समाज युवकांना घडवू शकतो.मोबाईलचा वाईट वापर करणार्‍या मुलांमध्ये चांगल्या मुलाची तुलना होऊ नये असे वाटते,कारण आज मोठ्या महागड्या ट्युशन न लावू शकणार्या मुलांसाठी युटुबवर असलेली लेक्चर होतकरू मुलांचे जीवन घडवणारी मोठी संधी आहे. त्यावर ही मुले ऑनलाइन शिक्षण घेऊन आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत.परिस्थितीला बदलू पाहत आहे.इथे इतकेच म्हणणे आहे कि, ज्या गोष्टी आज समाजामध्ये निर्माण केलेले आहेत हे येथील वीस- पंचवीस वर्षाच्या मुलांनी निर्माण केलेल्या नाहीयेत. हे यांच्या आधी पासून निर्माण झालेल्या आहेत, तर हा तुम्ही केलेल्या चुका या मुलांच्या माथी न लावता त्या त्यांच्या हातून पुढे न घडण्यासाठी प्रयत्नशील तुम्ही सर्वांनी असले पाहिजे. हे तुमचे सुद्धा तितकेच सामाजिक कर्तव्य आहे.आज मुठभर सुखवस्तू घरातील भटकलेल्या मुलांच्या आयुष्यावर बोलण्यापेक्षा जे होतकरू गरीब ,ग्रामीण भागातील शेतकरी ,मजुरवर्ग यांची मुलं आहेत त्यांना दिशा मिळणे महत्त्वाचे आहे यावर बोलणे मह्त्वाचे आहे. त्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे,कारण येथील सामाजिक राजकीय व्यवस्था यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचे नुकसान देखील करते आहे. बोलण्यासारखे लिहिण्यासारखे अनेक मुद्दे आहेत यावर बोलले जाते, पण या मुलांची परिस्थिती होती तेच आहे.शेवटी या पिढीला नाव ठेवण्याआधी या पिढीला सामोरे जाण्यात येणार्‍या प्रश्नांना सोडवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे सामाजिक प्रश्न आहेत कारण ते कुठल्याही एका मुलाचे प्रश्न नाही तर समाजातील,देशातील कितीतरी मुलं आज त्या प्रश्नांमुळे आपलं आयुष्य गमावत आहेत. त्यामुळे ही प्रश्न अत्यंत महत्त्वाची या प्रश्नांना मार्ग मिळणे महत्त्वाचे आहे असे वाटते.

✍अॅड.विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला