शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

मानवतेची प्रतिष्ठा जपूया.



आयुष्याच्या रंगमंचावर आपण स्वतःला या जगासमोर व्यक्त करीत असतो. घड्याळाकडे पाहून धावणार आपलं आयुष्य, तसे पाहता ते केवळ काटे धावत असतात,जे सेल संपले किंवा काढले की बंद पडतात. वास्तविकमध्ये आपलंच आयुष्य धावत असतं सुसाट वेगाने.घड्याळाचे काटे मागे पुढे करता येतात; पण आयुष्याचे मात्र तसं नाही.आयुष्य म्हणजे मृत्यूने कधीही कोणत्याही वेळी बंद होणारे दार आहे पुन्हा कधीच न उघडण्यासाठी, तेथून परतण्याची कोणतीच वाट नाही. हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा आपल्या जगण्यातील खोटेपण आपण न स्वीकारता तसेच जगत राहतो.
आयुष्याच्या या अथांग पटलावर प्रत्येकाला हवे ते त्याचे अवकाश मिळावे असे वाटते.कुठलाही भेद नसावा,प्रत्येकाला केवळ माणुस म्हणुन जगता यावं! आपल्याला हवे असलेले वैभव, प्रसिद्धी, श्रीमंती ही कशासाठी हवी आहे तर केवळ एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कमी लेखण्यासाठीच का? का इतरापेक्षा माझ्याजवळ हे सर्व आहे हा देखावा करण्यासाठी ?आपल्या देशांमध्ये, समाजामध्ये कितीतरी प्रश्न असतात जे आपण सहज रोज पाहतो आणि पुढे चालत राहतो; पण त्या प्रश्नामध्ये कोणीतरी जगत असतं त्याला सोडवणे महत्त्वाचं नाही का वाटत ?कोणाला नकोस वाटणारे सँडविच,पिझ्झा बर्गर म्हणून आणखीही खाण्याचे पर्याय निवडले जातात. पण कोठेतरी भाकरीसाठी आयुष्य वेचणारे लहान लहान चिमुकली सोकलेल चेहरे आपल्या नजरेत नाही का येत कधी?असे अनेक प्रश्न आहेत जेव्हा माणूस म्हणून जगण्याकडे बघितलं तर अनेक प्रश्नांचे उत्तरे मिळतील आणि आपण माणूस म्हणून त्याला सोडवण्यासाठी पुढेही होऊ; पण हे केव्हा बदलेल जेव्हा दृष्टिकोन निर्माण होईल ?स्वार्थाच्या पलीकडे जीवन काय असते हा विचार करु तेव्हा हे सर्व शक्य आहे. आयुष्याचे अंतिम सत्य मृत्यु आहे.ना इथले कोणते वैभव सोबत येणार, नाही कुठली श्रीमंती,शेवटी राहते ते केवळ नाव आणि ते ही काही काळापुरतेच.
गरीबी काय असते या शब्दाची व्याख्या आपल्याला ही करता येणार नाही,कारण या पलीकडे ती लोक जगत असतात. मनामध्ये कुठला ही अहंकार न ठेवता केवळ माणूस म्हणून नजर जरी फिरवली आपल्या अवतीभवती तर माणूसकीच्या हृदयाला पाझर फुटावा.
आपल्या जगण्यातील खोटेपणा काढून वास्तवातलं जगणं स्वीकारून माणूस म्हणून जगूया ना आपणं सर्वच!खोतेपणातील आनंद तर घेतच असतो आपणं ,आता वास्तवातील आनंद घेत जगून पाहून ना थोडं!जेथे माणूसकी म्हणून गरज वाटते तीथे मदत करूया, जेथे आपल्या हाताने कुणाचा त्रास कमी होईल ते काम करूया. आपल्या प्रतिष्ठेला ते शोभणार नाही हा खोटा विचार न करता केवळ मानव जन्माच्या माणुसकीच्या प्रतिष्ठेला ते शोभेल का? हा विचार करून माणुसकीची प्रतिष्ठा जपूया.
✍अँड विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

एक सांगु का बाबा,




एक सांगु का बाबा,
तुम्ही ना मला रोज आठवता.
जेव्हा कुठली मुलगी तिच्या बाबाचा हात ठेवून चालत असते. तेव्हा तुमच्या ही लाडकीचे काळीज आठवणीच्या नौकेत पार डुबून जाते.
किती छान दिवस होते ना बाबा ते जेव्हा तुम्ही सोबत असायचे!
कसलीच काळजी नसायची नुसतं जगण्याचा आनंद ओंजळीत असायचा.
त्या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद आजच्या भल्या मोठ्या गोष्टीत नाही दिसत.
पूर्वी चेहऱ्यावर येणारं निरागस हसू आता मात्र देखाव्यापुरतच येत.
काल नुसता विचार करित होते,बाबा असणे आयुष्यात किती मह्त्वाचे असते नाही का?
आयुष्यात आलेले वादळ तिथे हलकेच विरून जायचे .
कसलाच नसलेला ताप,कसलीच नसलेली काळजी हे सर्व तुमच्या त्यागाने आम्हाला मिळायचे.
आज मला तुम्ही दिलेली डायरी आठवते ,खुप जपुन ठेवलिय बरं मी!
आणि हो बाबा त्या लिहिलेल्या कविता वाचल्या की पुन्हा तुम्ही दिलेली दाद डोळ्यासमोर उभी राहते.
पेपरला दिलेली पेन किती उत्सुकता ती बाबा,वाटायचे कधिच संपू नये हे पेपर, कारण तुम्ही त्या वेळी घेतलेली काळजी फार आवडायची तुमच्या लाडक्या लेकिला .
घरी आले की तुम्हाला ही उत्सुकतेनं सांगावे कसा गेला पेपर आणि तुम्ही ही तितक्याच उत्सुकतेनं विचारावे.
किती किती गोड आठवनी ना ह्या बाबा
अलगद काळजात जीवनभर सांभाळून ठेवाव्या अश्याच!
कदाचित माझे मन तुम्ही दिलेल्या वात्सलेने अवघे आयुष्यभर भरलेच नसते;पण अवघे आयुष्य तर सोडाच बाबा,पण तुम्ही अचानक वादळासवे निघुन गेलात कधिच कधिच न परतण्यासाठी!
हा घाव मला पार कोसळून गेला.
ते न पेलणारे दुःखाचे डोंगर, तो विरह,तो आक्रोश,आजही ओल्याच आहेत त्या जखमा!
आयुष्यात कधिच न मनाला पटणारी गोष्ट म्हणजे बाबा तुमचे जाणे होय.
वादळ आले आणि निघुन गेले,सोबत माझ्या बाबाला ही नेले.सगळेच हरवले मी बाबा त्या वादळात!
पण एक सांगु का बाबा,
आधीपेक्षा ना तुम्ही माझ्या जास्त जवळ आहात.माझ्या प्रत्येक श्वासात,प्रत्येक आठवणीत.हवे तेव्हा मनातल्या मनात बोलू पाहते,अन जणू तुम्ही दाद द्यावी असा मृगजाळाचा भासही होतो बरं या कोवळ्या मनाला!
पक्षी उडून जावेत आणि नंतर त्यांच्या आठवणीच राहाव्यात असेच आयुष्यात घडून गेले.आज तुमच्या आठवणीचे पक्षी आयुष्यामध्ये मनात भिरभिरतात, जगण्याची वाट देतात आणि तुम्ही असल्याचा भास हलकेच मनात निर्माण करतात.
बाबा
प्रत्येक मुलीला ना बाबा तीचे बाबा खुप जास्त स्पेशल असतात.
माझे ही बाबा माझ्यासाठी खुप स्पेशल आहेत.
आजही आणि नेहमीच असणार!
कोणाचे बाबा शेतकरी असतात, कोणाचे डॉक्टर, वकील ,इंजिनिअर,अधिकारी, प्रत्येक जण आपल्या आपल्या परिस्थीतीतून आपल्या जीवनाची नौका पुढे करित आपल्या राजकुमारींचा लाड पुरवत असतात.
कोणती मोठी हवेली असो की, कोणाची छोटीशी झोपडी प्रत्येक घरामध्ये बापाची लेक त्याच्यासाठी त्याची राजकुमारी असते.
त्या राजकुमारीचा प्रत्येक हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न तिचे बाबा करीत असतात. आणि हे सर्व तुम्ही करायचे, माझा छोटासा हट्ट पुर्ण करण्यात तुम्हाला नकळत दिलेला त्रास आज मलाच मनात छळतो. ह्या सर्व हसण्या रडण्यात खुप आनंद होता.
मला खुप हसायचे होते,कधी रुसायचे होते बाबा तुमच्या सोबत,पण ह्या सगळ्या गोष्टी नियतीने दूर केल्यात माझ्यापासून,पण कोणत्याही काळाला तुमच्या माझ्या मनात असलेल्या आठवणी पासून दूर कधीच करता येणार नाही.
मनाच्या कोपर्यात बाप-लेकीचे विश्व मात्र मरेपर्यंत सोबत राहील...!
✍अॅड.विशाखा समाधान बोरकर
रा. पातुर जि. अकोला
08/09/2021
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

.......अन् जगु लागतील सर्व करुणेच्या मार्गावर

   शब्द तेच आहेत,
कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो....
शब्द बदलले की आम्ही ही बदलतो!
आम्ही माणुसच;
पण आम्हाला या शब्दांच्या मागे लागणे आवडत,
जगण्याला सुसह्य करणारी ही शब्द
कधी कधी माणसाला घेरतात,जातीपातिने !
सर्वांच्या रक्ताचा रंग तो लालच,पण तरिही आमच्यात अनेक अदृश्य भिंती,रुढी परंपरा उभ्या आहेत,तटस्थ दरी करुन!
पाहिल तर शब्दच ती जे भावनांसाठी व्यक्त होतात....
आणि आम्ही मात्र केवळ अर्थ बदलनार्या शब्दामागे धावतो भावना विसरून!
वाटेल तेव्हा माणसांचाच रक्तपात करतो,हृदयातील मानवतेला विसरून!

सिमेंट ,रेती, माती,विटा त्याच,
नेहमी आकारबध्द होवून एकत्र येतात,
यातूनच मंदीर, मज्जित,विहार,गुरुद्वार चर्च, बनतात
हया निर्जिव वस्तू एकत्र येऊन जगण्याचाच मार्ग सांगतात
या वस्तू पेक्षा निर्जिव तर आम्हीच,
कारण आम्हा माणसांना हे एकत्र येणे जमलेच नाही खरे!
आम्ही या मातीनेच बनलेल्या वस्तुसाठी मात्र
एकमेकांचा विरोध करित तिरस्कार करित जगत आलो.
पाहिले तर खरचं आम्ही अजुनही माणुस झालोच नाही.
कारण अजुनही आहे बुद्धीवर आमच्या अंधाराचा पडदा!
बस्स तो उठणे बाकी आहे,
मला विश्वास आहे उठेलच तो एक दिवस!
माणसातील माणुस जागा करण्यासाठी!

आम्ही प्रथमतः माणुसच
पण आमचे माणुसपण कधी या तर कधी त्या
जाळ्यात गुंतुण जाते.
डोळस असुनही आम्ही आंधळ्याचे सोंग घेतो
अन् मनात अंकुरलेल्या मानवतेचा नाश करतो !
जगण्यातील आनंद आम्ही गरिब श्रीमंतीने लेखतो
खरे तर अजुनही आमच्या बुद्धीचा खरा विकास बाकीच आहे म्हणा..!
अन्यथा मानवता विसरून आम्ही भांडलोच नसतो आपल्याच माणसांसोबत या ना त्या कारणाने!

ते पुस्तकाचे पाने मला जास्तच प्रिय वाटतात,
ते नाही दुरावत कोणालाच कधीही!
मला ती वाहणारी नदी आवडते, जी नाही नकारात तीचे पाणी तहानलेल्या व्याकुळ जिवाला!
मला तो अथांग समुद्र आवडतो जो घेतो सर्वचे सर्व आपल्यात सामावुन आणि एकरुप होऊन जातो सर्वांसाठी आपल्या उफाळून येणार्या लाटासवे !
हे आकाश पाहिले का कधी निरखून ते नाही नाकारत उडणे कोणाचे,आणि नाही कुठला उपहास कोणाचा त्याला....
ही झाडेवेली नाही नाकारत सावली कधी उन्हयात कहुरलेल्या जिवाला,ती देतात वात्सल्याची हिरवी छाया,अन अमृतमय फळे भरभरुन...!
अन भेदभाव तो कसला या निसर्गात,अवघी जीवसृष्टी नांदते येथे प्रेमाने!
फक्त आम्हालाच हे जमलं नाही, असं केवळ माणुस म्हणुन जगणं.....!अन् सोपं ही नाही बरं खरा माणुस म्हणुन जगण!
हा अनंत अज्ञानाचा अंध:कार कुठ पर्यंत राहिल बरं?
कळेलच माणसाला हया सर्व भौतिक गोष्टी पेक्षा बुद्धाची करुणा,मानवता मोठी आहे म्हणून!
आणि जेव्हा कळेल तेव्हा कोण कुठल्या जातीचा,पंथाचा,धर्माचा हा विचार दुर होईल,
केवळ पाहिल्या जाईल तो हाडामासाचा माणुस आहे म्हणून..!
गळून जातील सर्व जुनाट मानसिकता......
आणि पुन्हा नव्या मानवतेच्या विचारांची पालवी फुटेल....!
तेव्हा आम्हाला सर्वच अक्षरे आवडू लागतील,सर्वच रंग आपलेसे वाटतील,
आणि भेदभाव मिटेल एकदाचा....
जगु लागतील सर्व मानवतेने साठवलेल्या अथांग हृदयातील करुणेच्या मार्गावर!

✍अँड.विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला
07/07/2021
**************************************
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

अस्तित्त्व



हेवे दावे करण्यात आमचे 
आयुष्य अवघे सरले हो 
परतून रित्या ओंजळी 
मरण कुणाला सुटले हो 

क्षितिजाचे ते जगणे शोधता 
वास्तव आमचे हरले हो 
झोपडी-बंगल्याची सीमा कशाला
माणुसपण आमचे कुजले हो 

तो वैभवाचा ताज डोक्यावर 
साज कोणाचा सोबत आला 
माती मधिल जन्म आपुला 
मातीमध्येच संपेल हो

कागदाचे तुकडे भारी
आज तुम्हाला वाटते खरे 
जिव्हाळ्याची कमवा नाती 
खांदा तरी देतील हो

जातीपाती लिंगभेद तो
कसला विळखा कसल्या रुढी
सरणावरती जातील जळुनि
अस्तित्व देहाचे संपेल हो

अँड.विशाखा समाधान बोरकर 
रा. पातुर जि. अकोला 
10/08/2021

शनिवार, २४ जुलै, २०२१

'दिक्षा" समाजाला नवी दिशा देणारा लघुचित्रपट...!



सध्या परिस्थिती मध्ये दिशा भटकलेला युवा पिढीला मार्ग दाखवणारा लघुचित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या लिखाणाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारे हृदय मानव अशोक यांनी लेखन आणी दिग्दर्शित केलेला दीक्षा हा लघु चित्रपट अतिशय सुंदर आणि नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या समोर आला.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना विनम्र अभिवादन करून पुढे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना विचाराच वादळ मनात पेटून उठलेल्या समाजाच्या अनिष्ट मानसिकतेवर घणाघाती घाव करणारे यांच्या वादळात गुंतलेला युवक पुस्तकाच्या गारवा संस्काराच्या सावलीतून देण्याचे स्वप्न पाहत अभिवाद करतो.हा मिळेल त्याच्याशी स्नेहाने संवाद करतो. विचारांच्या धुंदीत बेधुंद घेऊन चालतो.काही तरी बदल घडवू पाहतो,,, माणसांच्या गर्दीत विचारांच्या दर्दीत हरवलेला युवक एका वडापावच्या गाडीजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी पितो. आणि वडापाव आहे का अशी विचारणा करतो.वडापावच्या गाडीचा मालक त्या कामगाराला त्या युवकाला वडापाव देण्यात बोलतो आणि तो इतिहासाच्या पुस्तकातील असलेले संविधान प्रास्ताविकेचे पान फाडतो हे सदर तो युवक पाहत असतो.तो त्याला ते प्रस्ताविकेचे पान फाडण्यास रोखतो,त्या कामगाराला बाजुला नेत त्याला त्या प्रस्ताविकेचे महत्व सांगतो.दिक्षा या मुलीवर वैचारिक खरे प्रेम करणारा युवक,त्याचे हे वैचारिक प्रेम त्याच्या जवळच्या काही मीत्रांना मात्र कळत नाही.दोघांची एकच विचारसरणी,एकच दिशा आणी ध्येय ही एकच ..!ही चार पाच मित्रे प्रस्ताविका या 26 जानेवारीला जनतेला वाटायचे ठरवतात.आणि त्या मार्गाने लागतात.तर तिकडे याच विचाराने,पेटून उठलेली दिक्षा आपणास भेटते या संपूर्ण लघुचित्रपटामध्ये दीक्षा या मुलीची समाजाकरिता धडपडणारी कहाणी दाखवण्यात आली आहे. घरामध्ये असलेल्या अंधश्रद्धेचा विळखा तिला नकोसा वाटतो. वेळोवेळी ती विरोधही करते आणि तिला संविधानाच्या प्रास्ताविकेचे मूल्य आपलेसे वाटतात. दिक्षा ही संघर्षाने पेटून उठते.ती तिच्या मैत्रिणीला काही वेगळे करू पहायचे म्हणते,,,आणी तिच्याही मनात संविधान प्रस्ताविका लोकांना वाटायचा विचार येतो..ती एका प्रेसला भेट देते,त्याला त्याबाबतचे विचारते,तिला तिथे मोठ्या प्रमाणावर प्रस्ताविका छापलेल्या दिसतात.छपाईकामगाराचे लक्ष नसल्याचे पाहुन दिक्षा त्या प्रास्ताविका हळूच आपल्या बैगमध्ये टाकते.आणि चोरुन घेतलेल्या त्या प्रस्ताविकेचा जनमानसात अगदी जीव ओतून महत्व सांगण्याचा तिचा प्रवास सुरु होतो.इकडे ही युवक मंडळी प्रस्ताविका होण्याची वाट पाहतात;पण तिथे जावुन विचारणा केली असता त्यांच्या हाती लागत नाहीत ,पुन्हा ते युवक प्रस्ताविका मिळवून नव्याने समाजात घरोघरी जाऊन,प्रत्येक माणसाला त्याचे महत्व पटवून देतात,या संपुर्ण कामात अनेक चांगले लोक त्यांना भेटतात.प्रोत्साहन देतात.दीक्षा ची आई अंधश्रद्धेवर मध्ये पूर्णता डुबलेली असते त्यातून मार्ग काढण्यासाठी दीक्षा अनेक प्रयत्नही करते;पण तिला चुप राहण्याचे घरातील तिला सांगतात. दीक्षा हे सर्व करीत असताना गोंधळून जाते पण आपल्या विचारांच्या ज्वालाला ती शांत ठेवत नाही तर संविधानाच्या प्रस्ताविका वाटण्याचा वसा ती चालूच ठेवते.या प्रस्ताविका चोरुन आणते हा मुद्दा पटत नाही मनाला, पण घरातील भौतिक परिस्थिती लक्षात घेता आणि तिची कर्तव्य दृष्टी लक्षात घेता तिच्या धैर्यशील वृत्तीला सलाम करावासा वाटतो.समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता,ही मूल्ये रुजविण्यासाठी तिचा तो वसा कौतुकास्पद आहे.या संपूर्ण लघुचित्रपटामध्ये शीतल साठे यांचे अतिशय अंगाला शहारे आणणारे सुंदर गीत आहे. या गीतामधुनी नवी प्रेरणा,नवी उर्जा निर्माण होते.
सोडून दीक्षा आपला प्रस्ताविका वाटत येते आणि तिकडून तो दीक्षावर वैचारिक प्रेम करणारा युवक आणि त्याचे मित्र मंडळी यांची एकत्र भेट होते. दीक्षा हा प्रस्ताविका चोरून आणून लोकांना वाटण्याच्या बाबात सांगते. एक दिवस घरातिल अंधश्रद्धेला कंटाळून सर्व जमा करून ती एका ठिकाणी घेऊन येते. आणि सर्वांची मित्रपरिवार ही पुन्हा नव्याने तिथे जमा होतात. आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतात. त्या दोघांचे वैचारिक प्रेम पुन्हा नव्या मार्गावर सुरू होते. एक दिशा ठरवून समाजासाठी कार्य करणारे पुन्हा नव्याने एका मार्गावर आरुढ होतात. अशाप्रकारे आजच्या बेताल जगणार्‍या युवकांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा करावा संविधानाचे महत्त्व व त्याचे मूल्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आणि आपण काय करू शकतो या संपूर्ण प्रेरणा देणारा लघुचित्रपट आहे. लघु चित्रपट असला तरीही या चित्रपटांमधून अनेक मुलतत्वे आणि गोष्टी आजच्या समाजासाठी खूप प्रेरणादायी बाबी आहेत. या सारख्या चित्रपटाची आज आपल्या समाजाला नितांत गरज आहे. त्या माध्यमातून भारतिय संविधान, संविधानाची प्रस्ताविका, संविधान प्रास्ताविका मध्ये असलेल्या गोष्टी या माध्यमातून लोकांना समजणे आवश्यक आहे. चित्रपट हा समाजाच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. दिक्षा या लघु चित्रपटातून केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. या चित्रपटामधील पूर्ण कलाकाराचे त्यांनी बजावलेल्या कामगारी बाबत खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐
✍अँड.विशाखा समाधान बोरकर 
24/07/2021
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

बुधवार, २ जून, २०२१

"कोती "समाजातील तृतीय पंथातील बालपणाची ह्रदयद्रावक कहाणी ......

समाजातील तृतीय पंथातील बालकाची हृदयद्रावक कहाणी मांडणारा कोती हा चित्रपट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकाच्या मनाला स्पर्शून अंतर्मुख करून जातो . ज्या समाजाला आपण आज विज्ञानवादी म्हणतो त्यामध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आजही तृतीय पंथातील माणसाला माणूस न समजता त्याला स्त्री- पुरुषापेक्षा वेगळं समजून समाजाने वेळोवेळी त्याचा धिक्कार केलेला आहे .तृतीयपंथी व्यक्तीला आजही समाजामध्ये खूपच जास्त हीन वागणूक मिळते आणि जेव्हा ही बाब लहान असताना माहिती पडते त्या लहान मनावर होणारे आघात काय असतील त्या वेदना अंतःकरणाला कशा आर पार करून जातात नात्याला सावरू पाहणारे माणसं हि ही परिस्थिती सांभाळू पाहतात , पण समाज स्वीकृत करत नाही या भीतीने कुटुंब सुद्धा बालवयात त्या जिवाचा धिक्कार करते .कोती या चित्रपटात श्याम या बालकाची हृदयस्पर्शी कहाणी पाहायला मिळते.
लहानपासून श्याम मध्ये मुलीसारखे नटण्या थटण्याचे गुण असतात , ग्रामीण भागामध्ये एका चांगल्या घरांमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत आणि लहान्या बभर्या भावासोबत आनंदाने जगणारा शाम त्याच्या आयुष्यामध्ये पावलोपावली नविन वळण येत जातात.

मला बहिण पाहिजे या लटक्या हट्टासाठी हट्ट करणाऱ्या बभर्या या लहान भावासाठी कधी शाम हा नटून-थटून बहीण बनून राखी बांधतो. तर कधी शाळेमध्ये आईवर सुंदर भावनिक निबंध लिहून आपल्याला आईसारखं व्हावंसं वाटतं अस सुंदर शब्दांकन करतो.त्याचं नटन त्याच्या बाबांना आवडत नसतं.त्याकरिता त्यांना बरेच वेळात त्याचे बाबा मारतात. एक दिवस शाळेतील मुलां समोर नर्तकीचा पेहराव घालून तो नृत्य करतो सर्व मुल त्याला उचलून शामली शामली अस ओरडत बाहेर आणतात .बाहेर कसलातरी कामांमध्ये असलेले श्यामची बाबा हा सगळा प्रकार पाहून खूप चिडतात आणि दोघाही भावांना मारतात.तेव्हा सर्व प्रकाराने घाबरुन गेलेला बभ्या घरात धावत येतो,आणि दरवाजाच्या मागे लपुन ठेवलेली दांडू लपुन ठेवतो.आणि कोपर्यात जाऊन लपतो.घरी संतापुण आलेला राजाराम घरी येऊन श्यामला मारण्यासाठी पट्टा काढतो तेव्हा त्याची आई कुसुम त्याला वाचवते आणि एका खोलीमध्ये बंद करते.इकडे लपुन बसलेला बभर्या आई वडीलांच्या गोष्टी एकतो आणि सत्यतता त्याच्या समोर येते.
श्याममध्ये मुलीचे गुण असतानाही समाजाच्या भितीने राजाराम श्यामला मुलगा आहे म्हणून जगण्यास सांगतो.पण त्याच्या वागण्यतील गोष्टी त्याला वेळोवेळी खटकाटात.त्यावेळी तो श्यामला त्याच्या दुनियेत पाठवण्याची तयारी करतो.या परिस्थितीत त्याचा लहान भाऊ बभर्या याचा कमालीचा संघर्ष दाखवलेला आहे.जेव्हा गावचा सरपंच आणि राजाराम त्याला घरातून बाहेर काढण्याची गोष्ट करतो तेव्हा बभर्याचे प्रश्न मनाला स्पर्शून जातात.जर कोणी व्यसनी आहे ,दारु पितो,त्याला समाजातून बाहेर काढल्या जातं नाही घरातून काढल्या जात नाही,श्याम वर्गात खुप हुशार आहे,पहिला येतो,तो कुणाला त्रास देत नाही सर्वांसोबत प्रेमाने वागतो मग का त्याला का बरे घरातून काढण्यात येते.........?राजाराम त्याला वेळोवेळी सांगतो "अरे तो आपला नाही"पण हे बभर्या काहीच ऐकत नाही. त्याला श्याम हा त्याचा भाऊ असतो,ज्याच्या शिवाय तो राहूच शकत नाही. कुसुम श्यामला घेऊन खुप दुखी असते.श्याम लहान आहे इतक्या लवकर त्याला पाठवू नका असे ती राजारामाला म्हणते,राजारामचा पण श्याममध्ये जिव असतो पण गावातील मानसिकतेचा विचार करुन तो या बोज्याखाली दबुन जातो.बभर्या राजारामला खुप म्हणतो की श्यामला कुठे पाठवू नका पण जेव्हा राजाराम त्याचे ऐकुन घेत नाही तेव्हा तो कधी कोणाला,तर कधी पोलिसात राजारामची तक्रार करतो,तर कधी भुत मामाला समजुन एका दारुडयाला त्याच्या बाबावर दबाव टाकण्यासाठी आणतो.
एकदा शाळेतुन येताना बभर्या आणि श्याम एका पड्क्या घरात एक पेटी फेकून देण्याचा विचार करतात,तेव्हा श्याम ते सर्व शृंगाराचे सामान पाहुन मला हे सर्व एकच वेळ घालू दे अशी विनंती बभ्याला करतो,आणि तो त्या पेटीतील फ्रॉक घालतो आणि आनंदाने गोल फिरतो.त्याला हे सर्व आवडत हे फेकू नको असे तो बभ्याला म्हणतो.त्याचा केविलवाणा स्वर ऐकून ते पेटी तो फेकून देणार नाही असे कबुल करतो.त्याच्या या वागण्याने बभ्याला पण दुख होत.पण तो त्याच्या भावनेचा विचार करतो.
श्यामला वाचवण्यासाठी वेळोवेळी बभ्याला राजारामचा मार खावा लागतो.श्याम आणि कुसुम हे सर्व पाहुन स्तब्ध असतात.श्यामच्या कोवळ्या भावना आईला पण कळतात.कधी राजाराम श्यामला दरित ढकलण्याचा प्रयत्न करतो तर कधी काही,या प्रत्येक क्षणाला त्याची सुट्का बभ्या करतो.
जेव्हा राजाराम तृतीय पंथाच्या प्रमुखाला भेटतो तेव्हा त्या प्रमुखाच्या बोलण्याचे घाव राजरामला निशब्द करतात.राजाराम कसले तरी पेपर आणुन श्यामला जवळ घेऊन त्याला दूर पाठवण्याची गोष्ट करते तेव्हा ते कागद बभ्या फाडुन टाकतो.राजाराम त्याला चितावणी देतो की तो श्यामला त्याच्या जगात पाठवल्या शिवाय राहणार नाही.शेवटी सर्व परिस्तितीला कंटाळून दोघे भाऊ घरातुन पडून जातात.एका हॉटेल मध्ये काम करताना हॉटेल मालकाला त्यांचे आई वडील कधी वारले कधी आजरी आहेत असे सांगातात.पण एका हवालदाराला दिसतात.हवालदार याना चांगलाच ओळखत असतो.इकडे मुल घरात नाही म्हनुन राजाराम आणि कुसूम खुप शोधा शोध करते.सर्व घाबरुन जातात.पण जेव्हा हवालदार त्याना गाडीवर बसुन आणतो तेव्हा राजाराम मुलाना मारतो.त्या रात्री श्याम घरातील सर्व झोपलेले असताना तो घरातून पेटी घेऊन निघुन जातो.सकाळी कुसुम जिवाचा आक्रोश करून रडते,आयबाया तील समजावतात.बभ्याला स्वप्न पड्ते,तो घाबरुन उठतो,राजाराम आणि सरपंच गाडीवरुन येतात,राजाराम निशब्द होऊन रडतो.बभ्या वेगाने धावत धावत त्याचा शोध घेतो,विहिर पाहतो,आणि रस्त्याने पडत सुटतो,तेव्हा रस्त्याच्या कडेला श्यामची पेटी आणि जो कपडे तो मुलगा म्हणून घालायचा ते कपडे पडलेले असतात,बभ्या श्याम करित रडत राहतो..................

अश्या प्रकारे अगदी समाजाच्या भितीने नेहमीच्या केलेल्या धिक्काराने श्याम पाऊले उचलतो........हा चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला रडवुन जातो.....कोती या चित्रपटाच्या निमित्ताने
चित्रपत निर्माते डॉ संतोष संपतराव पोटे, डॉ सुनीता पोटे
को उत्पादक: विजय Bhos, सचिन Lolage, गरूड, मॅडम
कार्यकारी निर्माते: शंकर धुरी
दिग्दर्शक: Suhaas भोसले
लेखक: Rajest Durge
पटकथा : राजेस्ट दुर्ग
संवाद: राजस्ते दुर्गें या सर्वांचे कौतुक केले पाहिजे.ज्यांनी हा चित्रपट समाजातील नेहमी समाजाने धिक्कारलेल्या, दुरावलेल्या एक वेगळा पंथ म्हणून हिनवले, माणूस असूनही त्याला जगण्याचा अधिकार नाही असा माणसाच्या दृष्टीत असणाऱ्या तृतीयपंथी यांचा लहानपणीचा प्रवास यांनी खुप भावनिक आणि त्याने सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा चित्रपट कोती हा सर्वांसमोर आणला. कायद्याने सर्वांना समान हक्क देण्यात आले. कुठलाही लिंगभेद न करता सर्वांना समान वर्तणूक देण्यात आली. पण हे सर्व असतानाही आजही समाजाची, माणसांची मानसिकता काही केल्या नाही बदलली. तृतीय पंथ म्हणजे समारंभामध्ये,रेल्वे स्टेशनवर, नाचगाणे गाऊन पैसे मिळवणे इतकेच काम नसून त्यांनीही आपल्या स्वकर्तुत्वावर आपल्या बळावर विविध क्षेत्रांमध्ये आज नाव उंचावले आहे.आणि याचे अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा समाजाने या सगळ्या भेदभावाला विसरून त्यांना सुद्धा एक माणूस म्हणून स्वीकार करणे गरजेचे आहे.कोती या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे किती ठिकाणी लहानपणी त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले असतील आणि येत असतील.अशावेळी समाजाच्या मनोवृत्तीचा विचार न करता घरच्यांनी,कुटुंबाने समाजातील या मानसिकतेचा धिक्कार करून त्यांना आपलंसं केलं पाहिजे नाही की त्यांना आपल्यातून वेगळा आहे म्हणून समाजातून बाहेर काढून त्यांच्या जगण्यातून आनंद हिरावून घेतला पाहिजे .तेही माणसे आहेत त्यांनाही भावना आहेत हे व इथल्या स्त्री-पुरुषांनी कधिही विसरु नये.

रविवार, ३० मे, २०२१

पुस्तक...

 

पुस्तक हातामध्ये पडल्यानंतर होणारा आनंद काही वेगळाच असतो.लहानपणी बाबा नेहमीच घरी पुस्तक आणायचे नवीन विषय, नवीन लेखक, सगळं वाचून झाल्यानंतर एक त्याच्यावर आमचं चर्चासत्र असायचं. बाबांना पुस्तकाचे विशेष आवड! पुस्तक वाचण्याची आवड भावंडांना सुद्धा ! पुस्तकप्रेमी घरामुळे घरामध्ये भरपूर पुस्तकं असायची. लहानपणी कळत नव्हतं हे लोक पुस्तकांमध्ये का इतके गुंतून जातात? तास न् तास हातामध्ये पुस्तक ठेवणे म्हणजे एक तपश्चर्याच नव्हे का? खुपच हुशार असतात ते लोक जे पुस्तक वाचतात असे मनोमन वाटायचं. घरामध्ये सर्व पुस्तक वाचायचे म्हणून मी काहीतरी नाटक म्हणून पुस्तक हातामध्ये घ्यायचे. सर्वांना कळावे की, मी पण पुस्तक वाचते म्हणून! बाकी अभ्यासाचेच पुस्तके जड जायचे तर बाकी पुस्तके वाचने दूरच !आताच्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की मनातच हलके हसू येते, आमचे लाॅचे पुस्तके पाहून आम्हाला म्हणणारे खूप लोक आहेत, बापरे ! किती मोठ-मोठे पुस्तक आहे हे आणि कधी वाचता तुम्ही!नकळत हसायला येतं.लहानपणी नाटक म्हणून हातात घेतलेले पुस्तक पुढे पुढे नकळत छान सवय होऊन गेली आणि पुस्तके मित्र बनली. एक घट्ट मैत्री होऊन गेली त्यांच्यासोबत कधी न तुटणारी !
पुस्तक हे कुठलेही असो कुठल्याही विषयाची असो ते ज्ञान देण्याचे काम करते पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान हे कधीच वाया जात नाही.पुस्तक वाचल्यानंतर माणुस वैचारिक होतो, त्याला चांगल्या वाईटाची जाणीव होते. सगळे जग तुमच्या सोबत भेदभाव करू शकेल; पण पुस्तक कधीही कोणासोबत भेदभाव करीत नाही ते सर्वांना सारखेच ज्ञान देते. त्यामुळे माणसाने नेहमी पुस्तक वाचले पाहिजे.

स्मशाने ही आता बोलकी झाली



स्मशाने ही आता बोलकी झाली
रडु लागली माणसांवर
रास लागली कशी इथे रे
काळ धावला जगण्यावर

भेटीगाठीची तूटली दोरी
सरणही न लाभे इथे कुणा
कुठे वाहती प्रेत हजारो
कुठे फेकती रस्त्यांवर

अश्रु वाहती क्षणोक्षणी
रोज हृदयावरी घाव नवा
उध्वस्त झाले घरे हजारो
वादळ दु:खाचे काळजांवर

निशब्द झाली रस्ते माणसे
निशब्द झालेय जगणेही
दूर जाहली माणसे अचानक
वेळ हातीही असल्यावर

जड झाली पावले आता
चालता वेदनेच्या काट्यांवर
जन्मभराची पायपीट कुठे
वेध लागले घरट्यांवर

सोकलेला चेहरा तो
मरणयातना भोगतोय रोज
मिळेल का गोळी कुठली
जड भाकरी सांजेवर

बंदिस्त विळखा काळाचा
प्रकाश कुठे ना दिसे इथे
कुठे असे रोज दिवाळी
कुठे निजती पाण्यावर


वेळ ही कठिण जरी
निघुन जाईल धीर धरा
धावून जा कठिण समयी
मिळुनी वार करू प्रसंगावर

✍ ॲड. विशाखा समाधान बोरकर
******************************************

सोमवार, १७ मे, २०२१

पुन्हा नव्याने पालवी फुटावी......!



सुकलेली पाने गळून जावी
पुन्हा नव्याने पालवी फुटावी
असेच घडो आयुष्यी आमच्या
सुखाची किरणे पुन्हा यावी..!

आव्हानांना पेलत पुढे जाऊन जिंकण्याची सवय माणसाला आहे , माणूस कधी घाबरला नाही कुठल्याही परिस्थितीत! संकटे आली आणि संकटे गेली तो मात्र सदैव परिस्थिती सोबत लढत राहिला.त्याचप्रमाणे हे कोरोना नावाचे संकटही काही काळापुरते आहे .संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत करून टाकणाऱ्या या व्हायरसने सगळीकडे हाहाकार करून टाकला.
अगदी सर्व सुरळीत चालू असताना अचानकच आलेल्या या वादळाला सामोरं जाणं इतकं सोपं नव्हतं तरीही माणूस त्याला धैर्याने सामोरे जात आहे. सुरळीत आयुष्य थांबल्या गेले, हातचा बेरोजगार गेला, लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. दुसऱ्या लाटेने तर हाहाकारच करून टाकला. डोळ्यासमोर आपली माणसे जात राहिली,आणि लोक निमूटपणे पाहत राहिली. ग्रामीण भागामधील दयनीय अवस्था डोळ्यांनाही बघवत नाही .ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटल आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने उपचारा अभावी लोकांचा मृत्यू होतो आहे.लोकांकडे पैसे नाही, खाण्यापिण्याचे डोळ्यासमोर भलेमोठे प्रश्न असताना या परिस्थितीसोबत लढने हे खूप मोठे आव्हान आहे. कुठल्याही व्यक्तीने हा कधीही स्वप्नामध्ये विचार केला नव्हता की अश्या परिस्थितीला त्याला सामोरे जावे लागेल म्हणून !
घरामध्ये राहून राहून मानसिक आरोग्य सुद्धा धोक्यात आलेले आहे . एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अगदी सहज रित्या पसरणाऱ्या कोरोनाला कुठल्याही प्रकारचे नियम न पाळल्याने ही वाढण्याचे काम काही महाभाग करीत आहे. कोरोणा आहे की नाही यावर होणारे विनोद सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेतल्याचे परिणाम हे आपणास दुसऱ्या लाटेच्या स्वरूपात दिसले .त्यांना झाला त्यांनी कोरोनाला सिरीयस घेतले आणि ज्यांना नाही झाला ते अजूनही विनोद करीत आहेत.
सरकार आणि नागरिकांनी जर वेळोवेळी सगळ्या उपाय योजना आणि नियमांचे पालन केले असते तर कुठेतरी अजूनही आपणास कोरोणावर यशस्वीरीत्या मात केल्याचे दिसले असते.ज्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही ते स्वतःच्या आरोग्यासोबत दुसऱ्यांच्या सुद्धा आरोग्यासोबत सुद्धा खेळत आहेत.हा जगण्या मरण्याचा खेळ कधी बंद होईल हा सामान्य माणसाचा निरागस प्रश्न!

एक झाले की एक संकटे मानवी आयुष्यावर येत आहेत .आधीच कोरोनामुळे खचलेला माणूस आणि त्यात पुन्हा नव्याने येत असलेल्या 'तौत्के' वादळाला सामोरे जाण्याची क्षमता माणसाने आणावी तरी कुठून ?अशावेळी नकारात्मकता ,जगण्यावर असलेल प्रेम कमी होण्याची शक्यता असते, पण जिथे मार्ग संपतो तेथून खरे आयुष्य सुरु करायचे ! न डगमगता ... ! कुठलीही वेळ ही कायम स्वरुपी नसते हे लक्षात असू दया. सद्या जरी मनात काहूरलेला अंधार आहे,पण उदयाला नक्किच नव्या आयुष्याचे किरणे घेऊन उगवणारी पहाट ही आपल्या आयुष्यात येईल..! ज्या प्रमाणे झाडाची सुकलेली पाने गळून पुन्हा त्याला नव्याने पालवी फुटते तसेच मानवी आयुष्यामध्ये हे कोरोना नावाचे संकट आणि हे येणारे वादळे जाऊन पुन्हा नव्याने आपल्या आयुष्यात सुखाची पालवी फुटेल...!

✍ ॲड. विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला
18/05/2021
*****************************************

शनिवार, १० एप्रिल, २०२१

स्त्री जीवनाचे उद्धारक क्रांतीज्योती म .ज्योतिबा फुले



उघडून दार शिक्षणाचे 
घडवली मोठी स्त्री क्रांती
स्त्री शिक्षणाचे तुम्ही प्रणेता 
धन्य धन्य तुम्ही क्रांतीज्योती
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे भारतीय इतिहासातले आद्य स्त्री समाजसुधारक , क्रांतिकारक., आपले विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारे ते बंडखोर, युगपुरुष दाम्पत्य होते. आपली वैचारिक मांडणी, लेखणीच्या कृतीतून त्यांनी अनेक आघाड्यांवर लढा दिला. जाती ,प्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी-कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी या सर्व अन्यायकारक रूढी वर त्यांनी संघर्ष केला.आज त्यांच्या संघर्षाच्या त्यागाने समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून त्या पुरुषाच्या बरोबरीने चालत आहेत .
आज महिलांची गगनचुंबी झेप फार कौतुकास्पद आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे श्रेय जाते ते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षणाची आराध्य देवता सावित्रीबाई फुले यांना . ज्यांनी स्त्री शिक्षणाचे बीज त्या कठीण काळात पेरुन आजच्या विशाल वटवृक्षाची उभारण्यात झालेली आहे .एवढा मोठा संघर्ष क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला, त्यामुळे आज आपल्याला ही परिस्थिती पाहता येते आहे .स्त्री हि कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही . प्रत्येक क्षेत्रामध्ये तिची झेप आहे. असे कुठेही क्षेत्र नाही, ज्यामध्ये स्त्रियांनी आपले अस्तित्व निर्माण केले नसतील. पण हे सगळे होत असतांना आजच्या स्त्रियांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श विसरता कामा नये.
त्या वेळी अनेक जुन्या रूढी-परंपरांना झुगारून नव्या क्रांतीचे मशाल हाती घेणे एवढे सोपे नव्हते.पण या सगळ्या गोष्टींचा विरोध झुगारून कार्य करून आपला संघर्ष सतत चालू ठेवून त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेत स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला.
ज्या स्त्रीचे चूल आणि मूल एवढेच सांभाळून आपले चार भिंतीच्या आतच अस्तित्व कोंडून ठेवण्यात येत होते, जिला घरातील कुठल्याच गोष्टीत बोलण्याचा अधिकार नव्हता, तीला नाना प्रकारच्या रुढी परंपरेत बंदिस्त करण्यात आले होते॰ या सगळ्या रूढी-परंपरांच्या बंधनांना तोडून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे स्त्रीयांसाठी खुले केले.त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे धर्म बुडाला अशी मान्यता होती.पण या सगळ्या गोष्टींना विरोध करत महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले.
महात्मा फुले यांनी पुणे शहरात बुधवार पेठेत मुलींसाठी शाळा काढली॰ त्या शाळेत सात मुली होत्या, ती फार दिवस चालले नाही नंतर तीन शाळा काढल्या होत्या. बुधवार पेठ, रास्ता पेठ या भागात शाळा काढल्या होत्या, त्या शाळेत अध्यापनासाठी एका शिक्षकाची गरज होती म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिकवुन अध्यापिका केले. सावित्रीबाईंनी शिक्षिका होण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. मुलीनी शिकू नये असा समाजाच्या रुढींचा प्रखर विरोध असताना कधी अंगावर शेन दगड झेलत त्या माउलीने तिचे कार्य चालूच ठेवले . एक शुद्र आपली पायरी सोडून असे वागते हे त्या काळातील उच्चवर्णीयांना सहन झाले नाही. पण जोतीरावांच्या माळी जातितील लोकांनाही हे आवडले नाही, या सर्वांनी जोतीरावांच्या वडलांवर दडपण आणले व पुढे पती पत्नीला घराबाहेर काढले पण हाती घेतलेले कार्य सोडून देण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी त्यांना शिक्षण विषयक कार्यात अत्यंत धैर्याने साथ दिली. घरचा आधार फुटल्याने फुले यांना उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र व्यवसाय शोधावा लागला. त्यामुळे त्यांनी कार्यशाळा काही दिवसासाठी बंद पडले आणि स्थिर झाल्यावर पुन्हा त्यांनी पुण्यात तीन शाळा काढल्या. .महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एका समाजाचे, एका पंथाचे, एका जातीचे नसून संपूर्ण समाजातील वाईट रूढी परंपरा विरुद्ध त्यांनी आपला लढा चालू ठेवला. विधवांचे केशवपन विरुद्ध मोहीम त्यांनी काढले .महात्मा ज्योतिबा फुले ब्राह्मण समाजातील विधवांचे केशवपण विरुद्ध झगडले. यांनी विधवांचे केशवपन करू नये असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले होते..फुले यांच्या काळी बालविवाहाची प्रथा होती साथीचे रोग येत , त्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुण बायका विधवा होतं या विधवांना वैविध्याचे जीवन जगावे लागे, या तरुण विधवा हरिदास, पुराणी किंवा कुणा नातेवाईकाच्या वासनेच्या बळी पडत त्या गरोदर राहत आपली समाजात बदनामी होऊ नये म्हणून जन्माला आलेल मूल कुठेतरी फेकून देत .महात्मा जोतीराव यांनी हे चित्र पाहिजे होते. म्हणून त्यांनी आपल्या घरीच हे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्यांनी आपल्या दारावर पाटी लावली होती. विधवानो येथे या सुरक्षितपणे बाळंत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल. या काळी त्यांना लोकहितवादी, रा .गो . भांडारकर ,बाबा परमानंद, तुकाराम तात्या, पडवळ यांचे सहकार्य लाभले.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुलबाळ नव्हते.वंशवेल कायम राहावी म्हणून दुसरे लग्नाचा त्यांना सल्ला त्यांचे वडील नातेवाईकांनी केला होता, पण त्यांनी धुडकावला. काशीबाई नावाची एक ब्राह्मण बालविधवा त्यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात बाळांत झाली होती. तिला पुत्र झाला त्याचे नाव यशवंत, त्याला फुले यांनी दत्तक घेतले त्या मुलाचे शिक्षण संगोपन केले, व शेवटी त्यांच्या नावे मृत्यूपत्र करून ठेवले .यशवंत डॉक्टर झाला ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मास आलेले यशवंत यांचे लग्न ही एक मोठी समस्या होती.हडपसरचे ग्यानबा कृष्ण ससाणे यांची मुलगी राधा यांच्याशी विवाह झाला. महात्मा ज्योतिबा फुले हे प्रखर विचाराचे क्रांतिकारी होते. अस्पृश्यांसाठी त्यांनी पाण्याची विहीर दिली. या दिवसात पाण्याची टंचाई जाणवली पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असत. हे विचार घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःची पाण्याची विहीर [हौद] अस्पृश्यांसाठी खुला करून दिला होता, त्या काळाचा संदर्भ पाहता ही बाब फारच क्रांतिकारक होती.
विधवांच्या प्रसूती बरोबर फुले यांनी अनाथ बालिकाश्रम चालवला . महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या सारसबागेत फुले यांनी पुनर्विवाह घडवून आणला होता. या उपक्रमात कधी सुशिक्षितांनी थोड्या प्रमाणात साथ दिली होती .बालविवाह बाला -जरठ विवाह, बहुपत्नीत्व, केशवपतन , आधी प्रथा वर महात्मा ज्योतिबा फुले यांनी कठोर हल्ले केले. बालविवाहाचे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट शब्दात मांडली होती. आपल्या वडीलधाऱ्या इष्ट मंडळीच्या सल्ला घेऊन आणि सर्व बाजूंनी सारासर विचार करून मुला-मुलींनी आपला जोडीदार निवडावा असे ते म्हणत . इ.स. १८८८ पासून ज्योतिबा फुले महात्मा म्हणून ओळखले जावू लागले, कारण कनिष्ठ वर्गासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. हंटर कमिशनला सादर केलेल्या निवेदनात त्यांनी विनंती केली होती की, स्त्रियांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणखी मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचा उपायोजना संमती द्यावी. शूद्र ,शेतकऱ्यांच्या दैन्यावस्था शिक्षणाचा अभाव हेच एकमेव कारण आहे, हे फुले यांनी आग्रहाने मांडले होते. यासंदर्भात त्यांनी पुढील काव्यपंक्ती प्रसिद्ध आहेत
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली!
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले 
इतके अनर्थ एका अविद्येने केले! 
महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक महाराष्ट्राच्या मूलगामी परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक मानले जातात. हिंदू समाजातील शूद्रातिशूद्रांच्या व्यथा त्यांनी बोलून दाखवला. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, इत्यादी ते जास्त वजनाच्या प्रश्न त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी न्याय व समता यावर आधारलेली आदर्श समाज प्रश्न सुधारण्याचा ध्येयवाद सिद्धांत सांगितला होता.
मानवाचे नैसर्गिक अधिकार हा महात्मा फुले यांचा सामाजिक विचारांचा केंद्रबिंदू आहे,ते मानवता धर्माचे एकनिष्ठ उपासक होते. त्यादृष्टीने त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरक झालेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा उद्घोष केला. ईश्वराने सर्व स्त्री-पुरुषांना एकंदर मानवी अधिकाराचे हक्क बहाल केले आहे असे ते मानतात. स्वतंत्र हा व्यक्तिमत्वाचा मूलभूत हक्क आहे. तो कोणत्याही एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही. सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रातील संबंधीचे आपले विचार व मते प्रत्येकाला व्यक्त करता आले पाहिजे असे मा. फुले यांना वाटायचे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाचा विविधांगी विचार केला. आपल्या लिखाणातून त्यांनी वेळोवेळी समाजातील रूढी परंपरा वर लेखणी स्वरूप शस्त्र उचलून घाव घातले. पुरुष लोभी दगाबाज पक्षपाती आहे, पुरुषांनी स्त्रियांना त्यांचे हक्क समजु दिले नाहीत, विद्या शिकण्यापासून त्यांना वंचित केले, असा फुले यांचा दावा होता. स्त्रीही त्यागी, प्रेमळ, कर्तव्यदक्ष आहे. ती नऊ महिने मुलाला वाढवते, त्याचे मलमूत्र काढते, मुलाचे लालन-पालन करते, मुला चालणे बोलणे शिकवते, सर्वांचे उपकार फिटणार पण तिचे नाही असा विचार ते मांडतात. त्याप्रमाणे निसर्ग सिद्ध मानवी हक्काचा उपभोग घेण्यास लायक पुरुषप्रधान संस्कृतीत निर्बंधामुळे मानवी हक्क नाही हा एक प्रकारचा सामाजिक अन्याय आहे .हिंदू धर्म शास्त्रकारांनी पुरुषांना अनेक सवलती दिल्या पण स्त्रियांवर मात्र अनेक बंधने लादली गेली, असे फुले म्हणतात .शेतकऱ्यांचा “असूड” या ग्रंथात महात्मा फुले यांनी शेती सुधारण्यासाठी अनेक उपाय योजना मांडल्या, त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, ते या सगळ्यात सामाजिक चळवळीच्या मध्ये सावित्रीबाई ह्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत होत्या. सावित्रीबाईंचे कार्य हे केवळ स्त्री शिक्षणा पुरते मर्यादित नव्हते. स्त्री शिक्षणाबरोबर अस्पृश्यतेविरुद्ध ही त्यांनी कार्य केलेले. त्यांनी महार वस्तीत स्वतंत्र शाळा काढली अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी घरचा हौद खुला केला, महिला सेवा मंडळ काढले होते व त्या स्वतः मंडळाचे सचिव होत्या. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून त्यांचा गौरव होत असते. शिक्षणाविषयी यांच्या उद्धाराचे कार्य सावित्रीबाईंनी खूप मोठ्या प्रमाणात केले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी खंबीरपणे सत्यशोधक समाजाचे कार्य मोठ्या हिमतीने चालू ठेवले. आपल्या काव्यातून त्यांनी शूद्र अतिशूद्र यांच्या अवस्थेचे चित्रण केले. समाजातील प्रश्नावर शिक्षण हाच उपाय आहे शिक्षणाने माणसातील पशुत्व नष्ट होते असा विचार त्या मांडतात.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी संपूर्ण आयुष्य आपले समाजासाठी वेचले आणि आज त्यांच्या कार्याचे फळ आपण सगळे आपला समाज प्रगतीच्या स्वरुपात पाहत आहोत . प्रत्येक समाजाच्या प्रत्येक बाजूला त्यांनी स्पर्श करून परिवर्तन त्या काळात घडवून आणले. त्यांचे लिखाण पाहता आजच्या काळातही त्यांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. स्त्री भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, या सगळ्या पदावर आरूढ होऊन तिने आपले अस्तित्व कोरले आहे असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे त्यांनी आपले अस्तित्व कोरले नाही. हे सगळं क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाचे फळ आहे.
आजची परिस्थिती पाहता स्त्रियांवर होणारे अत्याचार हे काही केला थांबत नाही आहेत, यासाठी सर्व स्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले अस्तित्व आणखी प्रखर करून आपल्यावर आलेल्या संकटावर उभे राहून स्वतःचे संरक्षण करून, समाजासमोर नवीन आदर्श घेण्याची नितांत आवश्यकता आहे. हा समाजाचा आदर्श घडवून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर मार्गक्रमण केले जाते आहे अस म्हटल्यास हरकत नाही. त्यांनी लावलेले शिक्षणाच बीज आज मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालेले दिसत आहे पण आज आपल्या समाजातील वाईट व रूढी परंपरा स्त्रियांनी खंबीरपणे लढून जिंकले पाहिजे.या महान क्रांतीज्योतींच्या विचारांची क्रांती सदैव मनात तेवत ठेवली पाहिजे आणि हीच काळाची खरी गरज आहे . 
अॅड. विशाखा समाधान बोरकर 
रा. पातुर जि. अकोला 
11/04/2021

संदर्भ – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
प्राचार्य डॉ. एस. एस. गाठाळ