शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या



कधी तरी बाबाच्या मनाच्या कोपर्यात जाऊन पहा
त्या थककलेल्या चेहर्यावर प्रश्न दिसतील दहा
त्या थकलेल्या चेहर्याचे उत्तर तुम्ही शोधून दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते वरुन वरुन दिसणारे रागीट बाबा
रागीट नसतात मुळीच!
ते शिकवत असतात जीवनाचे अनुभव
त्यांचे वात्सल्य म्हणजे अमृताची गोळीच!
ती गोळी वात्सल्याची कधी तरी चाखून घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

पटकन रागावणारे बाबा दिसतात हो सर्वांना
कधी पाहिले का कोणी बाबांना रडतांना
त्यांच्या ओरडल्यावर कधी तरी हसुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

त्या घरात कोण त्यांना समजत बरं
ज्याला त्याला आपलाच वाटत खरं
ते अनुभवाचे पुस्तक कधी तरी वाचुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते सावली प्रेमाची,किती गार गार वारा
त्या चेहर्यावर एकांती असती आसवांच्या धारा
एकांती रडणार्या मनाला,आयुष्याचा धीर दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

कधी तरी ते उदास मन घेतले का जाणून
कधी तरी पहावं त्यांच्यासाठी जगुन
हळूच कवटाळून त्यांना कुशित तुमच्या रडू दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते न रडणारे मन रडून जाईल
आयुष्यभरच्या वेदनेवर शब्दांची फुंकर होईल
ती शब्दांची फुंकर कधी तरी मारुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते असतात तोवर असते घराचे घरपण
त्यांच्या नसण्याने हरवते हिरवे बालपण
त्या हिरव्या सावलीत मुक्तपणे खेळुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


बाबा कळणे तसही नाही हो सोप!
आपल्या भाकरीसाठी त्या डोळ्याला न झोप!
उचलुन थोडं भार त्या डोळ्यांना झोप दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

आपल्या शब्दांचा नका करू किधीही प्रहार
थकलेल्या काळजावर असतो चिंतेचा भार
त्या चिंतेच्या भाराला कधितरी उतरवून दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


थकले म्हणून काय झालं,लाज कसली त्यांची
लहानपणी ही बापमाऊली प्रेमाने घास भरवयाची
असेल जरी थकेल अभिमानाने त्यांची ओळख दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


मित्राच्या बाबाच्या कारीची का रे तुम्हा ओढ
पायी वहाण नसलेला बाप नाकारतात पोरं
त्या अनवाणी पायाची लाहिलाही कधी पाहून घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


त्या अनवाणी पायाने तुला वहाण दिली
त्या उपकाराची ना कोणी किंमत केली
आयुष्य वेचनार्या बाबांला थोड आनंदच हसू दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

काळी माती रडू लागली





पाहता ते घाव हाताचे
काळी माती रडू लागली
ओरबडलेल्या काट्याने
रक्ताने ती नाहुण गेली

त्या अनवाणी पायाला
ती वहाण मायेची झाली 
बळीराजा तो लेक तिचा
कशी उपवासाची वेळ आली

न पावतो तो सावकार
न पावतो तो बाजार
मातीमोल मिळे भाव 
कष्टाची ना किंमत केली

काळी माती म्हणे तयाला
नको सोडू धीर तू राजा
येईल दिवस तूझ्याच रे
सपना त्याला दाखवू लागली

लेक होता निजलेला 
ती हळूच त्याला कुरवाळी 
लांबच झोप कशी राज्याला
ती चिंतेने ती पाहू लागली
हाक मारे ती लेकाला 
साद ना मिळाली तिला
घेतले तिने पांघरुन मायेने
काळी माती रडू लागली...

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

थोडं देऊन जा




द्यायचेच कोणाला तर 
 थोडं स्मित देऊन जा  
उपाशी पोटाला दोन
गोड घास घेऊन जा  
जगणे इथे, मरणे इथे
हा खेळ नाही नवा!  
तुझ्या असण्याचे
 तू गीत देऊन जा  


सुकलेल्या झाडाला 
थोडं पाणी देऊन जा 
 दारी आलेला चिमणीला
 काही दाणे  देऊन जा
 दिसला कोणी दुःखी 
कर त्याचे ओझे कमी  
दोन शब्द प्रेमाचे बोलून
 ओझे कमी करून जा  

रस्त्याने चालता चालता 
दिसतील तुला काटे  
हळूच तू ते वेचत
वाट फुलवत जा
जन्म भेटला कर मोल याचे
करता येईल तुला 
ते तू करत जा  

त्या अंधारलेल्या झोपडीत
प्रकाशाचे दिप होवुन  जा  
नसेल वात तया
 तू वात होऊन जा  
चंदनाचा घे वसा
 झिजत राहा नेहमी  
माणूस कसा जगावा
 ते तू सगळ्यांना सांगून जा!