शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

पुन्हा नव्याने जगुया आयुष्य.........


काही काळ कोरोणामुळे अचानकच बंद झालेल्या आयुष्यात पुन्हा नव्याने बाहेर जावेसे वाटते,
भन्नाट नेहमीसारखी शॉपिंग करावीशी वाटते.... आपल्या घराच्या परिसरात निवांतपणे फिरावस वाटतं.... कालपर्यंत या पायाला दम नसायचा;पण आज पाय अचानक घराच्या चार कोपऱ्यात बंदिस्त होऊन गेले . मनाच्या डोहात अलगत उठणाऱ्या भावनांना वाटव की पुन्हा उडत जाव या मंदमंद वाऱ्याबरोबर, अन् बेभान होऊन जावं या निसर्गाच्या सानिध्यात. पक्ष्यांच्या थव्यात उडत जावं..... फुलांच्या रंगात स्वतःला हरवून जावं..... निसर्गाच्या झुळझुळ वाहणाऱ्या झर्यामध्ये स्वतःला विसरून जावं. जणु हेवा वाटावा या पाखरांचा, आपल्यापेक्षा आज या विहंगाला जास्त स्वातंत्र्य आहे. किती निर्भीडपणे ते उडतात आकाशी. ना कुठले बंधने ती माणसाने निर्माण केलेली. नाही ते विषारी प्रदूषित हवा. या झाडावरून त्या झाडावर उडतांना या पाखरांना तितकाच आनंद होत असेल आणि त्यांना आनंदी पाहून त्या झाडांना ही खुप आनंद होत असेल कारण या सगळ्या गर्दीमध्ये आज झाडेही वाचलेली आहेत माणसाच्या वृक्षतोडीपासून.किती बरं हे विचित्र आश्चर्य आहे ना कालपर्यंत मुक्याजीवाची तोंड बांधणारा माणूस आज स्वतःच्या तोंडावर मास्क बांधुन फिरतो आहे.प्रत्येकाला त्याच्या केलेल्या कर्माची शिक्षा भोगावी लागते जणू निसर्गाने ही माणसाला दिलेली शिक्षाच आहे असं मनाला अलगत वाटून जाव. आज पुन्हा नव्या तन्मयतेने ते निरागस हरवलेल आयुष्य प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य शोधतो आहे.... रस्ते शांत झाली, पण वने मात्र बोलती झाली आहे त्या पाखरांच्या किलबिल किलबिल आवाजाने, माणसांची गर्दी येतास दूर पळणार्‍या खारुताई आज रस्त्यावर आनंदाने खेळताना दिसतात.
सकाळचे वेळी बाहेर पडले की आज आठवतो आहे तो पारिजातकाच्या फुलांचा सडा,त्याचा सुगंध घेऊन वाहणारा वारा, आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये रस्त्याने चालता चालता मन प्रसन्न करून जायचा. रस्त्यावरची गर्दी माणसाची, ती सर्वांना झालेली धावपळ, प्रत्येक जन आपल्या धुंदीमध्ये जगणारे माणसे, शाळकरी मुलांची धावपळ,ही मुले जणू सुट्टिची वाट पहायाचे. पण आज कित्येक दिवस झाले शाळा चालू झाल्यावर शाळेची घंटा वाजली नाही ,मनाला वाटणारी ती ओढ नेहमीच याने खालीपण वाटत आहे. आज लहान मुलांची दप्तराचे ओझे नसून हातामध्ये मोबाईल असून ऑनलाईन क्लासेस पाहण्यात मग्न झाले किती कंटाळा आलाय नाही का.....?नेहमीच निमित्त शोधून शाळेला दांडी मारणाऱ्या मुलांनाही आता शाळेमध्ये पळत सुटत जावसं वाटत आहे आणि आपल्या शाळेच्या मोकळ्या मैदानामध्ये बेधुंदपणे खेळावेसे वाटत आहे. वर्गामध्ये शिक्षकांनी शिकताना एखादेवेळी गृहपाठ केला नाही तर ती आता शिक्षाही आपलीशी वाटत आहे. ग्रामीण भागातील मुलांना मात्र या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे, कारण महागडे फोन घेऊन ऑनलाइन क्लासेस करणे गरिबांच्या हातच्या बाहेरची बाब असते. त्यामुळे याची पण शोकांतिकाच म्हणावी लागेल .आज आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण आपले बिझी आयुष्य शोधतो आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले, नाना प्रकारचे प्रश्न उभे झालेले आहेत; पण या सगळ्यांना तोंड देत सामोरे जावे लागत आहे हे सगळं काही माणसाला एक नवा अध्याय शिकून गेला. पण हे सर्व असताना. काल पर्यंत रोजच्या भाकरीसाठी रस्त्याने धावत पळत सर्वांना जाव लागायच त्यांना कधी वेळ मिळाला नाही आपल्या लोकांसाठी; पण या सर्व काळामध्ये आपल्या कुटुंबियांना वेळ मिळू शकला ही मात्र एक सकारात्मकता आपण नक्की बघावी. बर्याच महिन्यापासून सतत घरात असताना आज घरामध्ये कुणालाच रहावसं वाटत नाहीये; सगळ्यांनाच बाहेर जाऊन मोकळा श्वास घ्यावासा वाटतो आहे.काळ थांबत नाही तर सतत बदलत असतो, त्यामुळे आज आपण इतक्या दिवसानंतर काहीतरी नवीन नव्याने शिकला पाहिजे. आयुष्यामध्ये घराच्या बाहेर पडताना आता या सुंदर असा निसर्गाला असं जतन करून आपण त्याच्या मध्ये आणखीन भर टाकूया आपण माणूस म्हणून जगत आहोत पण जगताना इतर प्राणी सृष्टीला पण आनंदाने जगू द्यावं.
या संपूर्ण काळामध्ये माणसाच अचानक बंद झालेलं आयुष्य नंतर बाहेर पडताना जणु माणसाला पुन्हा नव्याने जन्म झाला असता वाटव. या अचानक झालेल्या गोष्टी माणसाला सहन करणं आणि त्यामध्ये जगणे ही खरोखर एक मोठी कसोटी असते आणि ही माणसाने पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडली आणि पाडतो आहे त्यामुळे सकारात्मकता ठेवून पुन्हा नव्याने जगण्याचे अंतरीचे कवळसे आपण जपूया.तेव्हा उघडा बंद मनाची द्वारे आणि येऊ दया प्रकाशाची किरणे......वार्‍याच्या मंद मंद झुळूकीवर पुन्हा स्वार होऊ द्या स्वप्नांना.....आयुष्याची कोवळी किरणे अलगदच प्रकाशमय करून जातील जग, अन् प्रसन्न होऊन जाईल प्रत्येक मन.तेव्हा जगुया पुन्हा नव्याने आयुष्य......

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

ज्ञानसूर्याच्या लेकरांनो...

 

ज्ञानसूर्याच्या लेकरांनो 

आज बेभान का रे झालात

माझ्या भिमबा ला

वाटले का रे गटागटात .......


गावातलं लेकरू आमचं

पुढारी झालय फार मोठं 

शिक्षणाचा झाला झीरो 

नेतागिरीची येते वरात.........


वादळाचे रे वंशज तुम्ही 

का भटकत चालले अंधारात

मृगजळाचा भास करुनी

खेचले जातयं तुम्हाला खड्यात........


क्रांतीचे वादळ अवघे

समावून घ्या लेखणीत

समाज चालला रे आपला

पुन्हा अज्ञानाच्या तिमिरात......


विषमतेची विषारी बंधने 

टाकित आहेत पुन्हा कात 

जाळुन घ्या हात तुमचा

जपण्या समतेची वात.....

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

कारण येथे सर्वांना जिंकायचे आहे........



जन्माला आलेल्या बाळाला दिले जाते इंजेक्शन जातीचं....... तर कधी म्हट्ले जाते हा मुलगा वंशाचा दिवा, तरी मुलगी परक्याचे धन....... मग कधी त्या बाळाच्या वर्णनावरून ही केल्या जात गोष्टी आणि सुरू होतो भेदभाव काळ्या- गोरेपणाचा....... माणूस म्हणून जन्म तर घेतो आपण पण गुंतल्या जातो येथील सामाजिक व्यवस्थेमध्ये........ कधीकधी खूप प्रेमळ आपुलकीचा वाटतो हा समाज, पण कधी कधी त्यातीलच काही गोष्टी मनाला न समजणार्या आरपार करून जातात. काही प्रथा, काही रूढी- परंपरा नकोशा का बर वाटतात........? आपल्यास माणसावर आपल्या समाजावर आपले नकारात्मक प्रश्न उठतात.... मुद्दे सर्वांची सारखीच असतात. पण बोलत मात्र कोणीच नाही. आपल्या भावनाला कोंडून गुदमरून जगतोय का आजचा माणूस.......? शाळेला जाणारा पोर परीक्षार्थी आहे की विद्यार्थी आहे, सुजान नागरिक बनवण्या ऐवजी त्याला स्पर्धक बनवून टाकलाय का पालकांनी.....? मुखवट्याचे आयुष्य जगणं चाललय सगळ्यांचे, स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतोय आपण असं वाटतंय आता. सुखाचा झरा शोधता-शोधता आपण एकमेकांशी तुलना करत चाललो आहे आणि आपल्या मनाचे समाधान मात्र हरवत बसलो आहे.स्पर्धा या शब्दाने जणू आयुष्य व्यापून टाकले माणसाचे. तो जगतो तर आहे पण ते केवळ जिंकण्यासाठी...... जिंकणे स्वाभाविक असते प्रत्येकाला जिंकाव असं वाटतं पण धावता- धावता आयुष्यातील खरेपण आयुष्य काय असतं हे तर आपण विसरत चाललो नाही ना..? याचा विचार मात्र खरंच माणसाने करावा. मनाचे समाधान हरवून आपण भौतिक गोष्टींमधून समाधान शोधतो आहे. एक चांगलं आयुष्य जगणे म्हणजे आपल्या आयुष्यात दुसऱ्याला मदत करणं, गरजूला मदत करणे,, उपाशी असलेल्या व्यक्तीला दोन घास भाकर देणे, आपल्या आयुष्यामध्ये ज्याला आपल्याकडून गरज आहे किंवा आपण ज्याची एखाद्या खरोखर गरजू व्यक्तीच्या कामी येऊ शकतो असे कार्य करणे म्हणजे पण आयुष्यामध्ये आपण समाधान प्राप्त करू शकतो. या स्पर्धेच्या युगामध्ये जिंकण्यासाठी आपण स्वतःला इतकं विसरून गेलो आहे की आपण आपले अस्तित्व निर्माण करतो आहे , पण खरं जगणं विसरलो हे मात्र खरे. ग्रामीण भागातील मुले पुणे मुंबईला जातात, तिथे शिक्षण घेऊन त्यांची मुलं परदेशी जातात आणि इकडे त्यांच्या आई वडिलांची कशी अवस्था आहे ते मात्र कोणी बघत नाहीत. आणि पुण्या-मुंबईतल्या मुलगा ग्रामीण भागामध्ये त्यांचे आई-वडील कसे जगतात हे बघत नाही म्हणजे आपण किती बिझी झालो हे कळते. आई वडील अर्थार्जनासाठी बाहेर पडतात तेव्हा मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते आई-वडिलांना वेळ देऊ शकत नाही अस असल्यामुळे आपण जगतो तर एकमेकासाठी पण आपण आपल्या नात्यांना वेळ देत नाही ही मात्र दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. जन्मापासून सुरू झालेली ही आयुष्याची स्पर्धा एक वेळ थांबणार आहे ,सर्व माणसे सारखीच , सारखीच भावना,रक्त ही सारखेच, मग एकमेकांच्या बद्दल कशाला विरोध आहे कसल्या जातीपाती ,कशाला, भेदभाव, माणसांने फक्त माणूस म्हणून का जगू नये....?येथे बोलले जात वृत्ती मात्र फारच कमी, कारण स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे.
इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते.....

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

आपल्याला जबाबदारीचे भान असायला हवे.

आपले राष्ट्रीय सण म्हणजेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस असले की, आपण सर्वजण आनंदाने स्टेटस ठेवतो व आपल्या फेसबुक वर फोटो टाकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो. पण हेच म्हणजे आपली खरी देशभक्ती आहे का......? देशभक्ती त्या दिवसा पुरतीच मर्यादित का राहते......? आज भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आहेत पण भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले.आपल्या जीवाचे हसत हसत बलिदान दिले. त्यांच्या स्वप्नातील भारत आज उभा दिसतो का....?
74 वर्षानंतर आज आपल्या देशाची स्थिती पाहिली तर आज ही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रगती पाहिजे तशी झाली नाही असे आपणास पहावयास मिळेल. समाजामध्ये जातीयता तेढ जातीवरून केलेल्या राजकारण पाहायला मिळेल. समाजामध्ये विविध गट पाहायला मिळतील. आजही स्त्री-पुरुषांमध्ये कमालीचा भेदभाव केला जातो. वर्णव्यवस्था अजूनही इथे आपणास पहावयास मिळेल. अजूनही भुकेने मरणारे लोक दिसतील आणि आपण म्हणतो की आपल्या देशाने प्रगती केली. खऱ्या अर्थाने देशाचे स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही आजही आपल्या समाजात ही विदारक परिस्थिती आपल्याला जबाबदारीचे भान करून देते आहे.
सहज नाही मिळाले आपल्याला हे स्वतंत्र, त्यासाठी रक्ताचे पाट वाहिले आहेत, आणि आज आपल्या हातामध्ये सगळं काही असताना आपण वास्तवाचे भान हरवून आपण आपल्या धुंदीमध्ये आपल्या स्वार्थापायी जगतो आहे. आपल्यामध्ये देशभक्ती फक्त राष्ट्रीय सणा मध्येच का जागृत होते ती दररोज का नसते , स्वातंत्र्य दिवसांमध्ये आपण हातामध्ये मिरवणारा आपला तिरंगा प्लास्टिक्स जागोजागी पडलेल्या दुसऱ्या दिवशी दिसतो तेव्हा आपण आपली जबाबदारी म्हणून तो उचलतो का......?एखाद्या गरीब मुलाच्या हातामध्ये भिकेचा कटोरा असेल तर आपण त्याच्या हातामध्ये वही पेन देतो का......? अशा वृत्तीचे देशभक्त काहीच अपवादाने सापडतात. एखादा अभिनेता वारला तर त्याच्या निधनाचा शोक करणारे सर्व असतात पण एखादा शेतकरी का आत्महत्या करतो? त्यावर बोलणारे मात्र कमी असतात.शेतकरी आपल्या देशाचा पोशिंदा आहे. ज्याच्या भरवशावर आपण आपले आयुष्य चांगले जगतो. त्याच्यासाठी कधीतरी आपल्या तोंडातून काही तरी निघते का...? तो कसा जगतो...? त्याला कुठल्या परिस्थितीमधून जगावे लागते त्याच्या मुलांना उच्च शिक्षण मिळते का ....? जेव्हा त्याचे पीक बाजारामध्ये येते तेव्हा त्यांना मेहनतीने रक्तघामाने पिकवलेले पिक सगळ्यांना स्वस्त हव असत. त्याच्या पिकाला बाजार भाव लागतो का......? त्या पिकावर त्याची कितीतरी स्वप्न असतात ते सगळे पूर्ण होतात का....? आणि कसा बरा आपला शेतकरी आत्महत्या करतो यावर कुणी बोलताना दिसत नाही.एक देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या माहीत असणे आणि त्या पूर्ण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशाची प्रगती कशी होईल, आपल्या देशातल्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी आपण त्यासाठी लढले पाहिजे हे एका जागरूक नागरिकाचे काम आहे.मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आपल्या सुसंस्कृत देशांमध्ये निर्माण होतो ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ही समस्या कमी करण्यासाठी पावले उचलून प्रत्येक महिलेला सुरक्षा बहाल करणे.तिला सामान समजने. तेव्हाच खऱ्या अर्थाने तिला स्वतंत्र मिळते आहे असा तिला म्हणता येईल.आजचे जबाबदारी हरवलेले युवावर्ग आपले सगळे जबाबदारीचे भान विसरून सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे. त्यांना आपल्या जबाबदारीचे भान येऊन आपल्या देशाचा विकास करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे यासाठी त्यांना झोपेतून उठले महत्त्वाच आहे असे मला वाटते..स्वतंत्र दिवस म्हणजे आपल्या महान वीरपुरुषांच्या त्यागाचे, बलिदानाचे स्मरण असते त्या स्मरणाचा विसर न होता आपल्या देशासाठी प्रगतीसाठी सदैव तत्पर राहणे महत्त्वाचे आहे.
सर्व तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला एखादा मुद्दा,विषय प्रश्न, अन्याय कारक वाटत असेल तो देशाच्या अहिताचा असेल तर त्यावर तुम्ही चर्चा करा, बोला, आवाज उचला देश व समाज तुमच्या मागे आहे.पण केव्हा जेव्हा तुम्ही त्यावर बोलाल तो प्रश्न सोडवला आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या देशाचा प्रगतीचा मार्ग आणखी मोकळा होईल,समाजात समानता प्रस्थापित होईल, समाजामध्ये एकता प्रस्थापित होईल, देशात अजुनही जातीवरुन भेदभाव होतो तो संपवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा संपूर्ण देशातील गरिबी निर्मूलन होईल, प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळेल,खर्या अर्थाने स्त्रीची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होईल, अंधश्रद्धा कमी होईल,खेड्यांनाचा विकास होवुन गावे समृद्धीने नांदतील,जगचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करणारं नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास झाला असे म्हणता येईल. तेव्हा उठा आणि आपल्या देशाच्या विकासासाठी कार्य करा ही आपली जबाबदारी आहे. आपल्या देशासाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी, आपल्या पावले उचलावी लागतील.
✍अॅड. विशाखा समाधान बोरकर
(कृपया लेख नावासहितच शेयर करावा)

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

आठवण...


खूप खूप कळलाय
प्रत्येक गोष्टीत जणू मज
बाबा माझा दिसलाय
ती पुस्तकाची अलमारी
तो टेबलावरचा पेपर
जणू क्षणापूर्वी तो
बाबांनी वाचून ठेवलाय

चहाचा कप हाती घेताना
त्या गप्पा खूप आठवतात
नकळत डोळ्यांमध्ये
विरहाचे अश्रूही साठवतात
.तो चहाचा कप हाती घेत
करणार का पुन्हा गप्पा
या आभासाच्या गोष्टी
क्षणोक्षणी मनी छळतात

तुमच्या खिश्याचा पेन
जपून ठेवलाय फार मी
कधी कधी हाती घेताच
नकळत डोळे वाहतात
नकोसे वाटते आज मज
हे दुनियादारीने केलेले कौतुक
आजही तुमच्या त्या शाबासकीसाठी
मनी जणू वेध असतात

बाबांच्या एका शब्दाने
जग जिंकल्याचा भास होई
त्या प्रेमावाचून जणु
आयुष्याला अर्थ नाही
क्षितिज वाटावे कमी
असे अथांग विश्व माझे
आठवणी त्यांचा नेहमी
माझ्या सोबत राही