बाबांपासून मात्र चार हात लांबच राहतात
आईवर त्यांना खूप कथा कविता सुचतात
बाबासाठी त्यांच्याजवळ शब्दही नसतात...'
अज्ञात कवीच्या या ओळींना अपवाद आहे ॲड विशाखा बोरकर ही नवोदित कवयित्री, लेखिका. आपल्या प्रिय बाबांच्या नितांत सुंदर, निखळ, नितळ प्रेमाचा अतिशय हृदय आठव 'आभाळमाया' या कादंबरीतून लेखिकेने शब्दबद्ध केला आहे. आता आताच एल. एल. बी. चे शिक्षण आटोपून वकिलीला सुरुवात करणाऱ्या या युवा लेखिकेने अगदी प्रारंभालाच जवळपास दोनशे पानांची कादंबरी लिहून साहित्याच्या प्रांतात दमदार पाऊल टाकले आहे. या अगोदर तिचा 'बंदिस्त रुढीच्या विळख्यात' हा कवितासंग्रह अगदी अलिकडेच प्रकाशित झाला आहे. या कवितासंग्रहाच्या मनोगतात 'कवितेचे बाळकडू मला बाबांकडून मिळालं' असे कवयित्रीने सांगितले आहे. तिचे बाबा कवी हृदयाचे, शांत, सोज्वळ, कुटुंबवत्सल व्यक्ती होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आदर्श होते.
या कवयित्री, लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वावर तिच्या बाबांचा अमिट ठसा आहे. ज्यांनी तिच्यावर अलोट प्रेम केले. ज्यांनी बालपणापासून अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तिच्यावर उत्तम संस्कार केले. निगर्वी साधेपणाचे आणि सत्शीलतेचे बीजारोपण केले. तिचे अतिसंवेदनशील, नाजूक, हळवे मन जपले. तिच्या डोळ्यातील आसवांना तळहातावर तोलून तिला खुदकन हसवले. तिच्या ओल्या पापण्यांमध्ये हिरवे स्वप्न भरले. हेच तिचे प्रिय प्रिय बाबा ती बारावीत असताना कॅन्सरच्या दुर्धर आजाराने हे जग सोडून गेले.
आयुष्यातल्या या प्रचंड वादळाने तिला पुरते उद्ध्वस्त केले. पितृत्वाची ही घनदाट छाया अचानक नाहीशी झाल्याने ती सैरभैर झाली. तिची जगण्याची उमेद संपून गेली. हा हादरा तिला सहन करण्यापलिकडचा होता. बाबा शिवायच्या जगण्याची कल्पनाही ती करू शकत नव्हती. क्षणोक्षणी तिला बाबा आठवत होते. ती उदास राहू लागली. आजारी पडू लागली. एकाकी झाली. या प्रसंगी तिच्या कुटुंबाने तिला खूप आधार दिला. तिचे मन जपले. पण तिला या धक्क्यातून बाहेर येणे कठीण जात होते. जगण्याचा रेटा म्हणून तिच्या भावाने तिला बारावीनंतर एल.एल.बी.ला ऍडमिशन घेऊन दिली. कॉलेज सुरू झाले पण तिचे मन रमत नव्हते. तिला घरादारात बाबा दिसायचे. बाबा गेल्याने खचून गेलेल्या आईकडे पाहून ती कॉलेजला जाऊ लागली. पण वर्गात तिचे मन लागेना. ती सारखी बाबांच्या आठवणीतच रमलेली असायची. तिला फार असह्य वाटायचे. यातून मार्ग शोधण्यासाठी तिचे मन धडपडू लागले आणि ती बाबांच्या आठवणी लिहू लागली. लिहिण्याची सवयही बाबांनीच लावली होती. रोज काहीतरी लिहिले पाहिजे या बाबांच्या सल्ल्यानुसार ती रोजनिशी लिहू लागलेली. त्यामुळे या आठवणींना शब्दात मांडणे तिला जमू लागले. बाबांच्या सानिध्यात राहण्याचा नवा मार्ग तिला गवसला होता. पहिल्या सेमिस्टर नंतरच्या दिवाळीच्या अवघ्या पंधरा दिवसांच्या सुट्ट्यात तिने रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागून बाबांच्या आठवांचा जो जागर केला तो जागर म्हणजे ही 'आभाळमाया' ही कादंबरी.
लेखिका विशाखा बोरकर ही अतिशय हळव्या, सुकोमल मनाची सालस मुलगी आहे, असेच या लेखनावरून दिसून येते. अतिशय निरागसपणे तिने बाबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तरल संवेदनशील मन लाभलेल्या लेखिकेने तिच्या विशिष्ट स्वभावानुसार जीवनाचा जो अनुभव घेतला त्याचे प्रकटीकरण या कादंबरीत आहे. या अनुभवात प्राधान्य आहे वडिलांच्या आठवणींना. अंतःकरणातील सारा जिव्हाळा ओततं तिने हे लेखन केले आहे. नव्हे हा जिव्हाळा, हे प्रेम आणि हे आपलेपण हा तिच्या जगण्याचा स्थायीभाव आहे. तो केवळ तिच्याच नाही तर तिच्या कुटुंबाचा स्थायीभाव आहे. आणि याला कारण आहे तिचे बाबा. अतिशय निष्कलंक, निस्वार्थी शांत, संयमी असणाऱ्या समाधान बोरकर या बाबांचे व्यक्तित्व खरोखरच त्यांच्या नावाप्रमाणेच समाधानी वृत्तीचे होते. कौटुंबिक स्नेह जपणारे ते कुटुंबवत्सल पिता होते, पत्नीचा सन्मान राखणारे आदर्श पती होते. चार मुलं आणि चार मुली अशा मोठ्या परिवारातही त्यांनी सर्व लेकरांना लाडाकोडाने वाढवले, त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. डॉ आंबेडकरांच्या कार्याची आठवण करून देत त्यांनी नेहमी लेकरांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शोषित वंचितांना, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. लेखिका लिहिते, 'बाबांनी आयुष्य समाजसेवेसाठी वाहिले होते. कापसाला भाव मिळण्यासाठी त्यांनी शेतकरी वर्गाच्या सोबत अनेक आंदोलने केली. शेतकरीवर्गाच्या विकासाच्या हितार्थ शेतकऱ्यांच्या परिषदा आमच्या शेतामध्ये भरवल्या जायच्या. त्यामध्ये मोठ्या मोठ्या तज्ज्ञांना, शेती मातीच्या अभ्यासकांना या परिषदेमध्ये बोलावले जायचे. त्या परिषदांत दूरवरून लोक सहभागी व्हायचे.' आपल्या शांत, सोज्वळ, ॠजू स्वभावाने त्यांनी माणसं जोडली होती.
आठ भावंडे,आजी-आजोबा अशा मोठ्या कुटुंबात लेखिकेला सर्वात जवळचे अगदी आई पेक्षाही जवळचे बाबाच वाटायचे. या कादंबरीच्या मनोगतात ती म्हणते, 'आम्हा आठ भावंडांमध्ये बाबांचा सर्वात जास्त जीव माझ्यात होता. मी त्यांची सर्वात लाडकी मुलगी होते.' बालपणी काऊचिऊच्या गोष्टी सांगत घास भरवणारे, थोपटून झोपवणारे, बोट धरून चालायला शिकवणारे, पडलं की खरचटण्यावर प्रेमाने फुंकर घालणारे मातृहृदयी बाबा तिला खूप खूप प्रिय होते. बाबांबद्दल या कादंबरीत ती एके ठिकाणी ती म्हणते, 'लहानपण पूर्ण माझ्या बाबांशी जुळलेलं होतं. कोणी बोलले तर बाबांना सांगेल अशी धमकी मी घरात सर्वांना द्यायची. काही दुखले खुपले की सर्वात आधी बाबांना सांगायचे. कशात नंबर आला की सर्वात आधी बाबा आठवायचे.' हळव्या मनाच्या लेखिकेला कोणत्याही गोष्टीसाठी पटकन रडू येते. ती रडली की तिचे बाबा म्हणायचे,'तुझ्या डोळ्यात तलाव आहे का? जेव्हा पाहावं तेव्हा रडत असते?' आपल्या या भावूक मनाला आपली कमजोरी करण्यापेक्षा आपले सामर्थ्य बनवून 'आभाळमाया' सारखी पितृप्रेमाची महामंगल गाथा तिने साकार केली आहे. अंतःकरणातील संपूर्ण जिव्हाळा ओतून तिने हे लेखन केले आहे. वडिल आणि लेकीच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, ममत्व अनेक घटनाप्रसंगातून लेखिका सांगत जाते तेव्हा सगळ्यांना हा आपलाच अनुभव वाटतो. लेखिकेची सांगण्याची पद्धत अतिशय साधी आणि सरळ असली तरी यातील कारुण्याने ते थेट वाचकाच्या हृदयाला भिडते.
या कुटुंबातील आई-वडील फार सोशिक, समजदार आहेत. रोजच्या साध्या साध्या प्रसंगातून ते मुलांना जीवनबोध देतात. फुलपाखराला पकडून त्रास देऊ नये, प्राणीमात्रांवर प्रेम करावे, शेतशिवारात कष्ट करण्याची लाज बाळगू नये, आल्या गेल्याचा सन्मान करावा, कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सोडून नये, अडल्यानडलेल्यांना मदत करावी, समाजोपयोगी कार्य करावी अशी कितीतरी जीवनमूल्ये ते लेकरांमध्ये रुजवतात. शेतकऱ्याच्या घरातील कामांची घाईगडबड याही घरात असली तरी ते मुलांशी संवाद करतात, मुलांशी खेळतात. एकदा तर सारे कुटुंब पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतात, हा प्रसंग लेखिकेने फार खुलवून सांगितला आहे. लेखिकेला सुरवातीला शाळेत जायला आवडत नसते तेव्हा एकदा आईने तिला मारले होते. या व्यतिरिक्त हे आई-बाबा मुलांना रागवताना, मुलांवर चिढताना, त्यांना मारतांना दिसत नाहीत. एके ठिकाणी लेखिका सांगते, 'काॅलेजमधून थकून घरी आले की बाबांनी माझा सुकलेला चेहरा पाहून म्हणावे, 'चेहरा सुकून गेला पोरीचा. बेटा जेवण कर बरं आधी.' आईने म्हणावं, 'आली का विशू?' तिच्या नजरेतले वात्सल्य सारा शिण घालवायचे. ते तिच्या अभ्यासाची विचारपूस करायचे. काही हवं नको विचारायचे. बाबा बऱ्याचदा बोलताना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे. सर्वांशी प्रेमाने वागण्याचा सल्ला द्यायचे. अशा छोट्या छोट्या घटनाप्रसंगातून लेखिकेने कौटुंबिक सौहार्द खूप छान व्यक्त केला आहे. माझ्या कुटुंबातील प्रेमळ वातावरण माझ्या मैत्रिणींनाही आवडायचे, असेही तिने एके ठिकाणी म्हटले आहे. लेखिका अगदी सहजतेने हे सांगत जाते तेव्हा वाचकांवरही या जीवनमूल्यांचे संस्कार होत जातात आणि वाचकमनाचे उन्नयन होते. हे सारे वाचताना न कळत साने गुरुजींच्या 'श्यामची आई' ची आठवण येते. या कादंबरीलाही 'श्यामची आई' प्रमाणे गौरव प्राप्त व्हावा असे मनापासून वाटते.
विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील पातुर या छोट्याशा गावातील हे शेतकरी कुटुंब असल्याने ग्रामजीवन, ग्राम संस्कृती आणि शेतकऱ्यांचे कष्टमय जगणे या कादंबरीत आले आहे. त्यामुळे ही कादंबरी देशियतेचा साज धारण करते. कधी महापूर तर कधी अवर्षण यात पिचलेला शेतकरी, शेतीकामाची लगबग, पेरणीच्या हंगामातील तारांबळ, पावसाळ्यात गळणारे टिना-कौलाचे घर, आर्थिक ओढताण, हाती पैसा नसतानाही मजुरांची आर्थिक नड भागविणारे लेखिकेचे बाबा, भल्या पहाटे लगबगीने घरचे काम आटोपून शेतावर जाणारी आई, आईबाबा घरी नसताना मोठ्या भावंडांनी लहान भावंडांना सांभाळणे, आई-बाबाना यायला उशिर झाला की सर्व भावंडांनी दाराशी बसून आईबाबाच्या येण्याची आतुरतेने वाट पहाणे, आईबाबांनी लेकरांना छातीशी कवटाळणे अशा अनेक प्रसंगांतून शेतकरी जीवनातल्या अनेक व्यथा, विवंचना आणि प्रेम, सौहार्दही लेखिकेने फार आत्मियतेने मांडले आहे.
हे कुटुंब अधूनमधून शेतातल्या घरी एक-दोन दिवसांसाठी राहायला जायचे. मूलांना आणि विशेषतः लेखिकेला शेतात राहाणे खूप आवडायचे. शेतातला निसर्ग, दिवसभर शेतात फिरणे, सापा-विंचवांचा सामना करणे, बाबांनी पोरींना शेतशिवाराची माहिती सांगणे, मायमातीचे ॠण व्यक्त करणे असे शेतजीवनाचे अनुभवही लेखिकेने ओघवत्या शैलीत मांडले आहे. एकदा खूप पावसामुळे नदी-नाले एक होऊन पूर आलेला. तिचा शेतात गेलेला मोठा भाऊ शेतातच अडकला. मुलगा घरी कसा येईल आई-बाबांना काळजी लागून राहिलेली. बाबा शेतात जायला निघाले. अर्ध्या वाटेवर पुरातून बैलगाडी काढत मुलगा येताना दिसला. बाबांना बरे वाटले. ते गाडीत बसायला गेले तर लेखिकेची मोठी बहीण अलका गाडीत दिसली. 'एवढ्या पुरात तू कशी आली?' पित्याने विचारले, तर 'तुम्ही पुलावरून येत असताना मी नदीतून आले', असे उत्तर तिने दिले. भावाच्या काळजीपोटी ही बहीण जीव धोक्यात टाकून भावापर्यंत पोहोचली होती. असे हे प्रेम, आपुलकी आणि आत्मियतेने भारलेले कुटुंब. लेखिकेची कथनशैली तर वाचकाला गुंगवून टाकणारी आहे.
सामाजिक उच्चनिचतेचे कडू घोट अजूनही समाजातील कनिष्ठ जातींना गळ्याखाली उतरवावे लागतात. एक प्रसंग लेखिका सांगते, 'दुपारच्या वेळी एक बाई बांगड्या घेऊन दारा समोरून जात होती. आईने त्या बाईकडून बांगड्या घेतल्या आणि 'भर उन्हात फिरत आहेस, पाणी पाहिजे का?' म्हणून विचारले. घरात जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आली. त्या बाईने पाणी पिण्याअगोदर आईला जात विचारली. आईला तर वाईट वाटलेच पण लेखिकेच्या बालमनावर यांचे चरे उमटले. बाबांनी 'जातीपातीच्या भिंती पाडून समाजात माणुसकीचे नाते निर्माण केले पाहीजे. आपण या अज्ञानी लोकांना समजून घेऊन सौहार्द जपला पाहीजे', असे बोलून दाखविले तेव्हा लेखिका त्या अल्लड वयातही, 'मी या भिंती पाडण्यात अग्रेसर राहील' असे आश्वासन बाबांना देते. बाबांना आपल्या लेकीचे खूप कौतुक वाटते. बाबा तिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवत समाजोपयोगी कार्य करण्याचा सल्ला देतात.
विशाखा बोरकर ही कवी मनाची लेखिका आहे, याचा प्रत्यय या कादंबरीतून वारंवार येतो. 'अंधार्या रात्री शरदाचं टपोरं चांदणं होतं. त्या टिमटीम लुकलुकणाऱ्या चांदण्या पाहून जणू आकाशात मोती जमा झाले असावे असा भास माझ्या मनाला व्हायचा. मी त्या चांदण्यांच्या विश्वात डुबलेले त्या चांदण्यांना न्याहाळत होते. तेव्हा खरच एक प्रश्न मनात निर्माण व्हायचा. जर रात्र झालीच नसती तर एवढ्या सुंदर चांदण्यांचे दर्शन कसे झाले असते?' अशी काव्यात्म वर्णनं या कादंबरीत बरीच आहेत. तिच्या बाबांच्या निधनाने तिच्या मनाची झालेली सैरभैर अवस्था, स्वप्नात, जागृत, अर्धजागृत अवस्थेत बाबांशी केलेला संवाद वाचकांच्या डोळ्यात पाणी आणतो. 'बाबा, नेहमी तुमच्याबद्दल दुःखाने आलेला हुंदका मी मनातच दाबून ठेवते. पण तेही मनच आहे, जे खूप चंचल आहे. ज्या मनाला मी कधीच रोखू शकणार नाही. या मनाला माहीत आहे सर्व. तरी हे मन तुमच्या येण्याची कोरडी वाट का पाहते? हे डोळे का शोधत राहतात तुम्हाला? तुमचा फोटो पाहिला की तुम्ही माझ्याकडे पहात आहात असे मला वाटते.' हे वाचून डोळे भरून येणार नाही असा वाचक विरळाच. कादंबरीच्या शेवटच्या काही प्रकरणात बाबांचे आजारपण, त्यांना जगविण्यासाठी कुटुंबाचा चाललेला आटापिटा, बाबांचे धिरोदात्तपणे आजाराला सामोरे जाणे, लेखिकेला होणारे असह्य दु:ख, बाबाशिवाय मला जगायचेच नाही म्हणून आलेला आत्महत्येचा विचार, साऱ्याच कुटुंबाचे कोलमडून पडणे, बाबांच्या मृत्यूनंतरची लेखिकेची विकलावस्था अशा कारुण्यपूर्ण वातावरणाला लेखिकेने आपल्या शांत, संयमी लेखनीने दिलेले शब्दरूप वाचताना न कळत डोळे पाणावू लागतात. करुणरसाचा परमोत्कर्षच आहे या शेवटाच्या प्रकरणांत.
लेखिकेच्या प्रामाणिकपणाचे आणि निरामयतेचेही दर्शनही कादंबरी वाचताना हरघडी होते. जंगलातून शेतात जाताना बाबांनी दाखविलेला उडणारा मोर सर्व भावंडांना दिसला पण तिला नाही दिसला. हे तिने कादंबरीत मोकळेपणाने सांगून टाकले. बारावीच्या परिक्षेत एका पेपरला अबसेंट राहूनही ग्रेस मार्क मिळून तिचे पास होणे तिने कुठलाही आडपडदा न ठेवता ती सांगते. एवढा प्रामाणिकपणा भल्याभल्यांनाही जमत नाही. म्हणून या लेखिकेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
या कादंबरीचे मुखपृष्ठ आतील आशयाला तोलून धरणारे आहे. चांदण्या रात्रीचे विलोभनीय सौंदर्य न्याहाळणारी सौंदर्यदृष्टी लाभलेले बाबा आज या रुपेरी काळोखात अंतर्धान पावले असले तरी आभाळमाया होऊन ते आपल्या लाडक्या लेकीच्या आयुष्याला प्रकाशमान करणार आहेत नव्हे तसे त्यांनी केलेलेच आहे, हा समर्थ आशय व्यक्त करणारे मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी मोठया कल्पकतेने काढले आहे. शक्यता आणि अशक्यतेच्या हिरवट, काळपट पार्श्वभूमीवर तेजाळता चंद्र आणि तारका, तसेच बाबांच्या स्नेह आशिषात प्रकाशमान झालेली लेक, असे हे मुखपृष्ठ पाहता क्षणीच रसिक, वाचकांचे मन मोहून घेते. मराठी साहित्यातील जेष्ठ, श्रेष्ठ लेखिका डॉ प्रतिमा इंगोले ह्यांनी या कादंबरीच्या मलपृष्ठावर लेखिकेची पाठराखण केली आहे. डॉ प्रतिमा इंगोले सारख्या मराठी साहित्याच्या जाणकार लेखिकेचा आशीर्वाद ही मिळकत लेखिकेने पदार्पणातच मिळविली आहे. विशाखा बोरकर या लेखिकेचे भविष्य उज्ज्वल आहे, याचेच हे सुचिन्ह आहे.
एकूणच लेखिकेला आरंभीच हाती घेतलेला हा कादंबरीचा मोठा पट लिलया पेलता आला आहे. खरेतर कादंबरी लिहावी म्हणून तिने हे लेखन केलेच नाही. केवळ स्वतःच्या सांत्वनासाठी आणि बाबांच्या आठवणी शब्दरूपात केवळ स्वतःसाठी जतन करून ठेवाव्या म्हणून तिने डायरीत लिहिलेले हे लिखाण आहे. यातील झळाळत्या जीवनमूल्यामुळे अनेक सहृदांनी सल्ला दिला आणि या आठवणी कादंबरी रूपात साकार झाल्या. त्यामुळे कुठलीही कशिदाकारी न केलेल्या तरीही अस्सल सौंदर्याचे देखणेपण घेऊन मराठीच्या साहित्य प्रांतात दाखल झालेल्या या रसरसीत साहित्यकृतीचे मनस्वी स्वागत आहे.
- @ डॉ प्रा सुनंदा बोरकर जुलमे,
नाईक नगर, नागपूर .
मोबा. ८७६६४२२४७५.
'आभाळमाया' कादंबरी
लेखिका-अॅड.विशाखा समाधान बोरकर
प्रकाशन-परिस प्रकाशन,पुणे
मुखपृष्ठ-अरविंद शेलार
मुल्य-300
विशाखा,करुणरसाने ओथंबलेल्या तुझ्या कादंबरीवर लिहिताना मलाही भावसंपन्न होत जाण्याचे समाधान मिळत गेले. तुला पुढील लेखनाकरिता मन:पूर्वक शुभेच्छा!
उत्तर द्याहटवा