मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

.......अन् जगु लागतील सर्व करुणेच्या मार्गावर

   शब्द तेच आहेत,
कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो....
शब्द बदलले की आम्ही ही बदलतो!
आम्ही माणुसच;
पण आम्हाला या शब्दांच्या मागे लागणे आवडत,
जगण्याला सुसह्य करणारी ही शब्द
कधी कधी माणसाला घेरतात,जातीपातिने !
सर्वांच्या रक्ताचा रंग तो लालच,पण तरिही आमच्यात अनेक अदृश्य भिंती,रुढी परंपरा उभ्या आहेत,तटस्थ दरी करुन!
पाहिल तर शब्दच ती जे भावनांसाठी व्यक्त होतात....
आणि आम्ही मात्र केवळ अर्थ बदलनार्या शब्दामागे धावतो भावना विसरून!
वाटेल तेव्हा माणसांचाच रक्तपात करतो,हृदयातील मानवतेला विसरून!

सिमेंट ,रेती, माती,विटा त्याच,
नेहमी आकारबध्द होवून एकत्र येतात,
यातूनच मंदीर, मज्जित,विहार,गुरुद्वार चर्च, बनतात
हया निर्जिव वस्तू एकत्र येऊन जगण्याचाच मार्ग सांगतात
या वस्तू पेक्षा निर्जिव तर आम्हीच,
कारण आम्हा माणसांना हे एकत्र येणे जमलेच नाही खरे!
आम्ही या मातीनेच बनलेल्या वस्तुसाठी मात्र
एकमेकांचा विरोध करित तिरस्कार करित जगत आलो.
पाहिले तर खरचं आम्ही अजुनही माणुस झालोच नाही.
कारण अजुनही आहे बुद्धीवर आमच्या अंधाराचा पडदा!
बस्स तो उठणे बाकी आहे,
मला विश्वास आहे उठेलच तो एक दिवस!
माणसातील माणुस जागा करण्यासाठी!

आम्ही प्रथमतः माणुसच
पण आमचे माणुसपण कधी या तर कधी त्या
जाळ्यात गुंतुण जाते.
डोळस असुनही आम्ही आंधळ्याचे सोंग घेतो
अन् मनात अंकुरलेल्या मानवतेचा नाश करतो !
जगण्यातील आनंद आम्ही गरिब श्रीमंतीने लेखतो
खरे तर अजुनही आमच्या बुद्धीचा खरा विकास बाकीच आहे म्हणा..!
अन्यथा मानवता विसरून आम्ही भांडलोच नसतो आपल्याच माणसांसोबत या ना त्या कारणाने!

ते पुस्तकाचे पाने मला जास्तच प्रिय वाटतात,
ते नाही दुरावत कोणालाच कधीही!
मला ती वाहणारी नदी आवडते, जी नाही नकारात तीचे पाणी तहानलेल्या व्याकुळ जिवाला!
मला तो अथांग समुद्र आवडतो जो घेतो सर्वचे सर्व आपल्यात सामावुन आणि एकरुप होऊन जातो सर्वांसाठी आपल्या उफाळून येणार्या लाटासवे !
हे आकाश पाहिले का कधी निरखून ते नाही नाकारत उडणे कोणाचे,आणि नाही कुठला उपहास कोणाचा त्याला....
ही झाडेवेली नाही नाकारत सावली कधी उन्हयात कहुरलेल्या जिवाला,ती देतात वात्सल्याची हिरवी छाया,अन अमृतमय फळे भरभरुन...!
अन भेदभाव तो कसला या निसर्गात,अवघी जीवसृष्टी नांदते येथे प्रेमाने!
फक्त आम्हालाच हे जमलं नाही, असं केवळ माणुस म्हणुन जगणं.....!अन् सोपं ही नाही बरं खरा माणुस म्हणुन जगण!
हा अनंत अज्ञानाचा अंध:कार कुठ पर्यंत राहिल बरं?
कळेलच माणसाला हया सर्व भौतिक गोष्टी पेक्षा बुद्धाची करुणा,मानवता मोठी आहे म्हणून!
आणि जेव्हा कळेल तेव्हा कोण कुठल्या जातीचा,पंथाचा,धर्माचा हा विचार दुर होईल,
केवळ पाहिल्या जाईल तो हाडामासाचा माणुस आहे म्हणून..!
गळून जातील सर्व जुनाट मानसिकता......
आणि पुन्हा नव्या मानवतेच्या विचारांची पालवी फुटेल....!
तेव्हा आम्हाला सर्वच अक्षरे आवडू लागतील,सर्वच रंग आपलेसे वाटतील,
आणि भेदभाव मिटेल एकदाचा....
जगु लागतील सर्व मानवतेने साठवलेल्या अथांग हृदयातील करुणेच्या मार्गावर!

✍अँड.विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला
07/07/2021
**************************************
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा