सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

उचला ते शस्त्र लेखणीचे ....



श्वास नी श्वास रोखला जातोय 
परिस्थिती आजची पाहता 
मन स्तब्ध होतंय, नजर खिळून जाते
शब्द अबोल होऊन जातात 
ही प्रदूषित झालेली माणसाची मने पाहून 
मनच आक्रोश करतेय फार 
ती जातीयतेची बिजे
नव्या जोमाने वाढायला लागली 
पुन्हा करू पहाताहेत 
खैरलांजली सम रक्ताचा थरथराट...
उन्नाव,खैरलांजली,हाथरस रोज घडतेय इथे
रात्रीलाच जाळल्या जाते तिला
न्याय मिळताच जीव जातो अंधारात 
वाटली असेल भिती
त्या मेलेल्या निष्पाप देहाची
म्हणूनच केली तिची राखरांगोळी रातोरात 
तो जातीच्या नावाखाली दबलेला आवाज उचला
ती कोणत्या जातीची मुलगी आता तरी विसरा,
ती फक्त मुलगी हाच विचार करा
ते जातीची गोळी घेऊन
निजलेल्या रक्ताला पेटून उठू दया थोड 
धर्म, पंथ, जात का येतेय अन्यायाच्या प्रश्नात 
हा पेटलेला आक्रोश पाहूनही तुम्ही 
असाल शांत तर समजा व्यवस्थेचा 
तुम्ही खरा गुलाम झालात...
तो खिशाला लटकवलेला पेन
फॅशनसाठी ठेवू नका खिशामध्ये 
उचला ते शस्त्र लेखणीचे 
अन लढा लढाई अन्यायाच्या विरोधात
नाही तर वेळ भयान येत राहील 
कधी होतील या ना त्या मार्गाने आघात..
आज गोठलेले तुमचे शब्द 
उद्या खेचल्या जातील जिव्हा
फ़ेका ते विष जातीयतेचे आता
नाहीतर उदया पुन्हा पडेल महागात...

✍अॅड.विशाखा समाधान बोरकर
🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा