रविवार, ३० मे, २०२१

स्मशाने ही आता बोलकी झाली



स्मशाने ही आता बोलकी झाली
रडु लागली माणसांवर
रास लागली कशी इथे रे
काळ धावला जगण्यावर

भेटीगाठीची तूटली दोरी
सरणही न लाभे इथे कुणा
कुठे वाहती प्रेत हजारो
कुठे फेकती रस्त्यांवर

अश्रु वाहती क्षणोक्षणी
रोज हृदयावरी घाव नवा
उध्वस्त झाले घरे हजारो
वादळ दु:खाचे काळजांवर

निशब्द झाली रस्ते माणसे
निशब्द झालेय जगणेही
दूर जाहली माणसे अचानक
वेळ हातीही असल्यावर

जड झाली पावले आता
चालता वेदनेच्या काट्यांवर
जन्मभराची पायपीट कुठे
वेध लागले घरट्यांवर

सोकलेला चेहरा तो
मरणयातना भोगतोय रोज
मिळेल का गोळी कुठली
जड भाकरी सांजेवर

बंदिस्त विळखा काळाचा
प्रकाश कुठे ना दिसे इथे
कुठे असे रोज दिवाळी
कुठे निजती पाण्यावर


वेळ ही कठिण जरी
निघुन जाईल धीर धरा
धावून जा कठिण समयी
मिळुनी वार करू प्रसंगावर

✍ ॲड. विशाखा समाधान बोरकर
******************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा