#हाथरस
#Hathras
येथील व्यवस्थेला आता तु पण बळी ठरलीस ....
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
येथील व्यवस्थेला आता तू पण बळी.. किती वेदनेने तळमळत असेल त्या आई वडिलांचं मन !काही दिवसांपूर्वीच डोळ्यांसमोर हसत खेळत असणारी त्यांची मुलगी आज नकळत वेदनेच्या आक्रोशात त्यांच्यापासून दूर गेली, कधीच न परतण्यासाठी...
तिच्यावर अत्याचार होऊन इतके दिवस होऊनही न्याय देणारे हात कमी उठले आणि त्या अन्यायाला दाबणारे हात जास्त मिळाले. आधी ही अफवा आहे म्हणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढणारे अत्याचार हे काही केल्या कमी होत नाही आहेत.त्याचे एक उदाहरण कारण ती जर दलित मुलगी नसती आणि श्रीमंत घरातील असती तर ही गोष्ट वाऱ्यासारखी जिकडेतिकडे पसरली असती. जेव्हा हे अत्याचाराचे प्रकरण घडलं तेव्हा आमचा मिडिया बॉलीवूडमध्ये चालेल्या अनावश्यक गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करून होता. नेमकं हेच नेहमी होतं आणि या वेळीसुद्धा हेच झाले. कुठल्या दलितांवर झालेला अत्याचार असो किंवा कुठल्या गरिब स्त्रीवर झालेला अत्याचार असो,तो आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिक केला जातो, त्यातील हाथरस हे प्रकरण सुद्धा सुरुवातीला दाबण्याचे प्रयत्न झाले.आजही मोठ्या प्रमाणात ही प्रकरणे दाबली जातात त्यातील काहीच मुलींना न्याय मिळतो बाकी याच व्यवस्थेला बळी पडून अन्यायाच्या आक्रोशामध्ये शेवटचा श्वास घेतात. देशातील समाज व्यवस्था मानसिकदृष्ट्या आजही स्त्रियाप्रती बदललेली नाही. दिवसेंदिवस त्यांच्यावर होणारे अत्याचार हे वाढतच चालले आहेत.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 14 सप्टेंबर 2020 ला गावातील 4 लोकांनी 19 वर्षीय मागासवर्गीय मुलीवर सामूहिक बलात्कार व मारहाण केली त्यामुळे तिचा दिनांक 29 सप्टेंबर 2020 ला दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पीडित मुलगी आई सोबत शेतात गेली असता तिला आरोपींनी शेतातून उचलून नेले व जातीयवाद्यांनी अत्याचार केला. प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत.अत्याचाराला बळी ठरलेल्या पीडित मुलीच्याआई-वडिलांवर ती गेल्यामुळे दु:खाचा पहाड पडला अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही आई-वडिलांना दिला जात नाही ही कुठली व्यवस्था आहे...? आणखीन किती दिवस हे अत्याचाराचे सत्र चालू राहणार...? आणखी किती मुली बळी ठरतील...?आम्ही निमूटपणे पाहण्याचे काम करणार का...?कधी बदलणार येथील समाजातील मानसिकता...? काही दिवसापूर्वीच खैरलांजी प्रकरणाला २९ सप्टेंबर २०२० रोजी १४ वर्षे पूर्ण झाली.हा मनावर केलेला आघात सावरता सावरत नाही तर, पुन्हा या तरुण मुलीवर अत्याचार होऊन तिला आपला जीव गमवावा लागला.ती बोलू शकू नये, म्हणून तिची जीभ कापण्यात आली आणि तिला चालता येऊ नये म्हणून तिची हाडे तोडण्यात आली.आज हाथरस येथिल पीडिता अत्याचाराशी लढता-लढता या जगातून निघून गेली. पण तिच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे. त्या चार नराधमाला फाशी झालीच पाहिजे.पीडितेचा आवाज होऊन आज प्रत्येक भारतीयांनी आवाज उचलून हाथरस येथिल पीडिते सारख्या आणखी कुणाचा बळी न जाण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. पीडितेवर झालेल्या अत्याचारासाठी या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तेव्हा कुठे समाजातील असे कृत्य करून आणखी कुठल्या निष्पाप मुलीचा जीव घेण्यासाठी कोणताच हात उचलण्याचे धाडस होणार नाही.
येथे रोज घडते हाथसर
काहींना मिळतो न्याय
काहींचा होतो विसर
गुन्हाच ठरतो येथे
ती स्त्री असण्याचा
ती आक्रोश करते एकटी
आम्ही मात्र बेफिकर
तिची जात कोणती आहे
ठरवू नका आता तरी
कारण तुमची ही मुलगी चालत असते
रस्त्याने एकटीच भरभर
कित्येक दाबली प्रकरणे अशी
कित्येक हरवल्या पीडिता
द्या सुरक्षा आणि द्या बळ लढण्याचे
समाजकंटक जगतील आनंदाने
आणि पीडिता हरवत राहतील नाहीतर.
#हाथरस
#Hathras
©️अॅड.विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला
01/10/2020
********************************************
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛