रविवार, २० सप्टेंबर, २०२०

खेड्यातील मुल म्हणजे मातीतील मोती........



थोडे उनाड वाटणारे........., आपल्याच तंद्रीत आनंदाने जगणारे....... कसलाच भय त्यांच्या हृदयात नसणारे ही आमची गावाकडची मुल, असतो केवळ चेहऱ्यावर आनंद आणि घ्यायचं असतं क्षितिजाला कवेत एवढे धाडस मनगटामध्ये असतं.पायाला लागलेल्या मातीचा त्यांना विट्टाळ वाटत नाही,मातीला अंगाखांद्यावर घेणारे, त्यावर खेळणारे, आयुष्य जगणारे, ते मातीतील मोती असतात. त्यांच्यासाठी ती माती नसतेच कधीही! त्यांच्यासाठी त्यांची ती आई असते, आपली मातृभूमी जिच्यावर ते जीवापार प्रेम करतात. सौंदर्यप्रसाधने वापरून त्यांना आपलं सौंदर्य फुलवायचं नसतं, ते तर सूर्याच्या प्रकाशात आणखीन प्रकाशणारे सूर्याची मुलच असतात! नाले, ओढे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन आपल्याच आनंदात जगणारे निसर्गाचे मित्रच ते ,त्यांचे ते एक अतूट नातं. त्यांना देखाव्याच्या वैभवामध्ये कसलं मन रमत नाही. त्यांना त्यांची झोपडी व त्याच्यात खाल्लेली अर्धी भाकर त्यातच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी झळकत असत. नाही जमत त्यांना ती स्टॅंडर्ड इंग्लिश बोली; पण त्यांच्या त्या आपल्या बोलीभाषेमध्ये जिव्हाळ्याची आपुलकी असते. ही उनाड वाटणारी मातीतील मोती मात्र मातीच का राहून जातात .......??????त्यांच्या स्वप्नांना का पूर्ण होण्याआधी कुस्करल जातं.......????शिक्षणाच्या वयात हातात खुर्पे घ्यावे लागते याला जबाबदार कोण????गरिबीला लढत मोठे होणारे खुप अधिकारी आहेत;पण शिक्षणातुन मन गेल्यावर पुन्हा हाती पुस्तक घेणारे हात जबादारीणे पार खचून जातात,कधी गणिताची भिती,कधी ती नकोशी वाटणारी इंग्रजी,जिचा a फोर apple इतकीच पुढे आमच्या मुलांची गाडी पोहचलेली असते.आणि ती पुन्हा त्यांना कधीच पुढे जाऊ देतच नाही.कधी पेन -पेन्सिल ,वह्या- पुस्तक याला पैसे नसतात,तर कधी बाहेर गावाला शिक्षणासाठी पैसे नसतात,कितितरी प्रश्ने आहेत या निरागस मुलांची,जी अजुनही सुटता सुटत नाही.पुढे अल्पभुधारक शेतकरी जगणे समोर असते,तर तेही नसले तर रोजीरोटीसाठी मजुर होवुन जाते ते उद्याचे भविष्य! जर ही मूल चांगल्या श्रीमंत घरी जन्माला आले असते तर हा प्रश्न कधीच आला नसता.
पाचवीला पुजलेलं त्यांच दारिद्र हे त्यांच्या अपयशाचे कारणे होत तर नाहीत; पण त्यांच्या यशाच्या मार्गाच्या आड येणारे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जे मुलं आपल्या आई-वडिलांना लहानपणापासून निसर्गाच्या केलेल्या प्रत्येक घावावर प्रत्यक्षपणे तोंड देऊन जिंकायच पाहतात.ज्या मुलांना प्रत्येक संघर्षाला तोंड देऊन जगण्याचं बळ मिळतं, ते मुल अचानकपणे शिक्षणाच्या बाबतीत का मागे राहतात.......????? ती होतकरू हुशार असून त्यांना परिस्थितीनुसार जगून जबाबदारी मध्ये अडकून आपल्या शिक्षणाच्या पेनाच्या जागी नांगर वखरंच का हाती धरावा लागतो.........?????? कुठे मोठे शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही यांच्याकडे नोकरी लागण्यासाठी पैसे नसतात मग सुशिक्षित बेरोजगारीचा ठप्पा माथी लावुन आयुष्य जगावं लागतं. हे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ग्रामीण भागातील मुलांची आहे. या स्पर्धेच्या काळामध्ये शंभर जागेसाठी हजारोनी फॉर्म जमा होतात. त्यापैकी शंभर निवडतात बाकीच्यांचे काय होते हे त्यांनाच माहिती. जर का या मातीतील हिऱ्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणारे शिक्षण उपलब्ध करून दिले किंवा त्यांच्या चांगल्या गुणांचा वापर व्यावसायिक या उपक्रमांमध्ये जर केला तर त्यांचा विकास होऊ शकतो.का ग्रामीण भागातील मुलांना, माणसांना छोट्या-छोट्या मजुरीवर शहरी भागामध्ये व्यवसायासाठी पडावे लागते ?जर का या व्यवसायाच्या गोष्टी आपल्या गावात मध्ये निर्माण झाल्या तर त्यांना तिथे जाऊन आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागणार नाही. रानमळयात वाढणारी ही निसर्गाची मूल,आभाळाच्या मोठ्या संघर्षाला तोंड देण्याचे सामर्थ्य यांच्यामध्ये आहे. मातीतील मोत्यांची किंमत कळायला हवी.दिवसेंदिवस होत जाणार शिक्षणाचे बाजारीकरण जर असच चालत राहिल तर या मुलांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावं हा मोठा प्रश्न. आजचे शिक्षण म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्यामध्ये बाहेरील क्लासेस लावायचे सामर्थ्य आहे, त्यांचंच झाल आणि ही सत्य परिस्थिती आहे. पण ग्रामीण भागातील मुलांची होणारी हालअपेष्टा याचं मात्र कोणाला तीळमात्रही फरक पडत नाही. उलट त्यांच्या बोलीभाषेतून, कपड्यालत्त्यातून राहणीमानातून त्यांना हिणवलं जातं.यातील काहीच मोजकेच मुलं आपल्या आयुष्यात चांगल्या रीतीने जगू शकतात आणि चांगल्या रीतीने मोठ्या पोस्टवर अधिकारी बनू शकतात; पण बाकीच्यांचे काय हा प्रश्न तोपर्यंत सुटणार नाही ;जोपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न योग्यरित्या सोडवल्या जात नाही, कारण शिक्षणाचे होणारे बाजारीकरण आणि शिक्षण दरबारामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळातल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत. आयुष्याच्या येणाऱ्या नवीन नवीन वळणावर मग यांच्या हातातून वही पुस्तक दूर होऊन जबाबदारीचे ओझे पाठीवर येते.ग्रामीण भागातील हे प्रामुख्याने मजुरांची आणि शेतकऱ्यांची असतात त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आपोआपच येते. नंतर काही दिवसातच त्या मातीतील मोत्यांची माती घेऊन जाते. त्यामुळे या मोत्यांची किंमत झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा