रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

थोडं देऊन जा




द्यायचेच कोणाला तर 
 थोडं स्मित देऊन जा  
उपाशी पोटाला दोन
गोड घास घेऊन जा  
जगणे इथे, मरणे इथे
हा खेळ नाही नवा!  
तुझ्या असण्याचे
 तू गीत देऊन जा  


सुकलेल्या झाडाला 
थोडं पाणी देऊन जा 
 दारी आलेला चिमणीला
 काही दाणे  देऊन जा
 दिसला कोणी दुःखी 
कर त्याचे ओझे कमी  
दोन शब्द प्रेमाचे बोलून
 ओझे कमी करून जा  

रस्त्याने चालता चालता 
दिसतील तुला काटे  
हळूच तू ते वेचत
वाट फुलवत जा
जन्म भेटला कर मोल याचे
करता येईल तुला 
ते तू करत जा  

त्या अंधारलेल्या झोपडीत
प्रकाशाचे दिप होवुन  जा  
नसेल वात तया
 तू वात होऊन जा  
चंदनाचा घे वसा
 झिजत राहा नेहमी  
माणूस कसा जगावा
 ते तू सगळ्यांना सांगून जा!

1 टिप्पणी: